नवी दिल्ली – ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभर चिंता व्यक्त केली जात असताना सध्या अस्तित्वात असलेल्या लसी ओमायक्रॉनवर प्रभावी ठरतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हि. के. पॉल यांनी मत व्यक्त केले आहे.
सध्याच्या लसी करोनाच्या अस्तित्वात असलेल्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी ठरतील. करोनाचे व्हेरिएंट अजून इतके स्मार्ट झालेले नाहीत की ते लसीमुळे तयार झालेले सुरक्षा कवच भेदू शकतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र आपल्या देशात मास्क घालण्याचे प्रमाण हळूहळू कमी झाले आहे त्याबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, लस आणि मास्क या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. आपण जागतिक परिस्थितीपासून शिकायला हवे. आपण सध्या या बाबतीत डेंजर झोनमध्ये आहोत आणि अतिशय जोखमीच्या आणि अस्वीकारार्ह अशा पद्धतीने वर्तणूक होऊ लागली आहे, अशी टीका त्यांनी केली.
नागरिकांनी मास्क काढू नये असे आवाहन करतानाच जागतिक आरोग्य संघटना सातत्याने मास्कचा वापर कमी होत असल्याबद्दल सतर्क करत आहे. ओमायक्रॉनचा जागतिक पातळीवर वेगाने होणारा प्रसार चिंता वाढवणारा आहे. मास्क आणि लस या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून अद्याप मास्क काढण्याची वेळ आलेली नाही, असे पॉल म्हणाले.