मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना काल धमकीचे पत्र आले होते. या पत्रात पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावरून त्यांनी तक्रार दाखल केली असून संरक्षणाची मागणी केली आहे.
काल माझ्या जुन्या निवासस्थानी आलेले पत्र मला आज प्राप्त झाले. सदर पत्र उघडले असता, माझ्या विषयी अतिशय अश्लील भाषा वापरून मला व माझ्या कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर पत्रामध्ये माझ्याविषयी असलेला मजकूर हा अतिशय लज्जास्पद असून महिलांची विटंबना करणारा तसेच माझ्यासहित समस्त महिला वर्गाला वेदनादायी व क्लेशदायक असा आहे.
सदर विषयाबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र तसेच स्थानिक भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे, अशी माहित देत आपण संरक्षणाची मागणी केली असल्याचे पेडणेकर यांनी नमूद केले.
मागील दोन-तीन दिवसातील घडामोडींचा विचार करता व प्राप्त पत्रातील मजकूर लक्षात घेता सदर व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश संबंधितांना देण्याची मागणी पेडणेकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच मला व माझ्या कुटुंबीयांना त्वरित विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी या पत्राद्वारे महापौरांनी केली आहे. पेडणेकर यांना या अगोदर फोनकॉलद्वारे धमकावण्यात आले होते.