पिंपरी – रात्रीच्या वेळी एकट्याने जाणाऱ्या महिलांनी पोलिसांना फोन करावा. त्यानंतर पोलीस येतील आणि आपल्या वाहनाने महिलेस तिच्या घरी मोफत सोडतील, अशा प्रकारचा एक मेसेज सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. हा मेसेज खूप जूना असून चंदीगढ पोलिसांनी सुरु केलेल्या उपक्रमाला पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांचा उपक्रम सांगून व्हायरल केला जात आहे. अशा प्रकारचा कोणताही उपक्रम पिंपरी-चिंचवड पोलीस राबवित नसल्याने अशा प्रकारे खोटे मेसेज व्हायरल करुन अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या अडचणीत आणखी वाढ करण्यासारखे आहे.
रात्रीच्या वेळी एकट्याने जाणाऱ्या महिलांना अनेक गंभीर घटनांना सामोरे जावे लागते. महिला सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्यातूनही एकट्याने जाणाऱ्या महिलांवर अत्याचार होतात, छेडछाड होते, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरुन नेले जातात. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा महिन्यांत लैंगिक अत्याचाराचे 201, विनयभंगाचे 361 गुन्हे दाखल आहेत. वाढत्या गुन्ह्यांच्या आकडेवारीमुळे अशा प्रकारच्या अफवांचे मेसेजही वेगाने व्हायरल होत आहेत.
डिसेंबर 2019 मध्ये नागपूर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नागपूर मध्ये अशा प्रकारची योजना सुरु केली होती. रात्री उशीरा कामावरुन परतत असताना असुरक्षित वाटत असेल, संकटात सापडलात तर हेल्पलाइनवर संपर्क करा, असे आवाहन त्यांनी केले होते. प्रत्येक पोलीस ठाण्यात या उपक्रमासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूकही केली होती. मात्र आयुक्त बदलताच त्यांचा उपक्रम देखील बासनात गुंडाळला गेला.
असा आहे मेसेज
पोलिसांनी मोफत राइड योजना सुरु केली आहे. जेथे रात्री 10 ते सकाळी सहा या वेळेत महिलांना एकट्याने घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसेल, तिथे महिला पोलीस हेल्पलाइनवर कॉल करुन वाहन मागवता येईल. फोन केल्यानंतर जवळचे वाहन येईल आणि महिलेला तिच्या घरी विनामूल्य सोडेल, असे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे.