अहमदाबाद – हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड बंडखोरीचा आणि असंतुष्टांच्या नाराजीचा सामना करावा लागला. तेथे आता मतदान झाले आहे व राजकीय पक्षांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. मात्र गुजरातमध्ये अद्याप मतदान व्हायचे आहे. जे हिमाचल प्रदेशात झाले तेच गुजरातमध्येही होते आहे.
गेल्या 27 वर्षांपासून या राज्यात सत्तेवर असल्यामुळे सरकारविरोधी नाराजी असणार आहेच. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून 38 आमदारांचे आणि बड्या नेत्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. 182 पैकी 160 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यांचा पत्ता कट झाला आहे त्यांनी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी आणि जाहीर निषेधाचे काम सुरू केले असून या समस्येला थोपवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.
रविवारी अमित शहा यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची गुजरातमध्ये बैठक घेतली. तब्बल पाच तास चाललेल्या या बैठकीत स्थितीचा आढावा घेण्यात आला. बंडखोरांच्या विरोधता आक्रमक विधाने करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल प्रेमाने आणि आपुलकीने बोला असे शहा यांनी सूचवले असल्याचे त्यानंतर सूत्रांकडून सांगण्यात आले.
शहा यांच्या म्हणण्यानुसार जे लोक नाराज आहेत ते बराच काळ भाजप परिवाराचे सदस्य राहीले आहेत. त्यामुळे ते आता जर नाराज झाले असतील तर त्यांच्याशी समोर बसून चर्चा करू. त्यांच्याशी प्रेमाने बोला. त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका अशा सूचना शहांनी दिल्या.