कोलंबो – गेल्या आठवड्यात कोलंबोच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असताना सिंगापूरचे एक मालवाहू जहाज पेटले असून हे जहाज आता बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर तेलगळती होण्याची शक्यता निर्माण झाली असून पर्यावरण संघटनांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
“एक्स-प्रेस पर्ल’ या जहाजाला लागलेली आग विझवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी झाले आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या तेलगळतीला सामोरे जाण्याची तयारी प्रशासनाकडून केली जाऊ लागली आहे, असे कोलंबोतील प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे. हे जहाज अजून अस्थिर असून लवकरच ते समुद्रात बुडण्याची शक्यता आहे.
“एक्स-प्रेस पर्ल’ या जहाजावरच्या टाक्यांमध्ये 325 मेट्रिक टन इंधनाव्यतिरिक्त 1,486 कंटेनरमध्ये सुमारे 25 टन धोकादायक नायट्रिक ऍसिडदेखील आहे. या जहाजातून कोणतीही तेलगळती झाल्यास पर्यटकांचे एक मोठे आकर्षण असणाऱ्या संवेदनशील नेगोंबो या खाऱ्या पाण्याच्या सरोवराकडे हा तेलाचा तवंग जाईल, असा इशारा सागरी पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने दिला आहे. या जहाजातून सांडणाऱ्या तेलाच्या आणि अन्य द्रव पदार्थांच्या संपर्कात न येण्याची सूचना यापूर्वीच स्थानिक नागरिकांना करण्यात आली आहे.
हे मालवाहू जहाज गुजरातमधील हजिरा येथून कोलंबो बंदरात सौंदर्यप्रसाधनांसाठीची रसायने आणि कच्च्या मालाची वाहतूक केली जात होती. कोलंबोच्या बंदराच्या बाहेर किनाऱ्यापासून 9.5 सागरी मैलांवर जहाजाने लंगर घातला होता. तेथेच या जहाजाला 20 मे रोजी आग लागली, श्रीलंका नौदल, श्रीलंका पोर्टस ऍथॉरिटी आणि सागरी पर्यावरण संरक्षण प्राधिकरण यांचे विशेष पथक 21 मे रोजी अग्निशमन कंटेनर जहाज गाठले आणि आग विझवण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली होती.
भारतीय तटरक्षक दलानेही मंगळवारी आयसीजी वैभव आणि वज्र ही दोन जहाजे मदतीला पाठवून दिली होती. खवळलेला समुद्र आणि खराब हवामानामुळे हे मालवाहू जहाज आता उजवीकडे झुकले आहे, परिणामी, जहाजावरील काही कंटेनर समुद्रात कोसळले आहेत आणि त्यातील काही बुडाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.