सोलापूर : सोलापूरजवळ बुधवारी सकाळी एका गोडेतेलाच्या टँकरचा अपघात झाला आणि टँकर रस्त्यावर पलटी झाला. त्यात गोडेतेल रस्त्यावर वाहू लागले. दरम्यान,अपघातग्रस्त ठिकाणापासून जवळच्या गावात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. अन् बघता बघता नागरिकांची गोडेतेल पळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. कोणी घागर …कोणी कळशी किंवा मिळेल ते भांडे घेऊन लोकांनी गोडेतेल घरी नेण्यासाठी गर्दी केली.
महागाईच्या झळीने होरपळलेल्या नागरिकांनी घागर, कळशी अन् मिळेल त्या भांड्यामध्ये गोडेतेल लंपास केल्याचे समोर आले आहे. गोडतेल घेऊन जाण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील सांगवी गावानजीक गोडेतेलाच्या टँकरचा बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अपघात झाला. टँकरचा टायर फुटल्याने टँकर विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला अन् ही दुर्घटना घडली.
टँकर पलटी होताच टँकरमधून गोडे तेलाच्या धारा वाहू लागल्या. गोडेतेल घेऊन जाण्यासाठी घागरी, डबे आणि मिळेल ते साहित्य घेऊन लोकांनी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. मात्र पोलीस प्रशासनाने येऊन लोकांना पांगवले. महागाईच्या जमान्यात लोकांनी भरभरून तेल नेले. मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटवरून हा टँकर बंगळुरुच्या दिशेने चालला होता. त्याचवेळी टायर फुटल्याने हा अपघात झाला.
दरम्यान या टँकरच्या अपघातानंतर उसाच्या ट्रॅक्टरचाही अपघात याच ठिकाणी झाला. ट्रॅकटरच्या ट्रॉलीचा सेंटर बोल्ट तुटल्याने हा अपघात झाला. अपघातामुळे संपूर्ण रस्त्यावर ऊस पडले होते. सुदैवाने दोन्ही अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र महामार्गावरील दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर यामुळे परिणाम झाला. मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून अपघातग्रस्त वाहनांना दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे.