नगर – नगर महापालिका संचालित व रोटरी क्लबच्या सौजन्याने सुरू केलेल्या महापालिकेच्या “रोटरी कोव्हिड केअर सेंटर’मधून शंभर रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. उपचार पूर्ण झाल्याने महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
महापालिकेच्या या कोविड सेंटरमध्ये एकाचवेळी 120 करोनाबाधित रुग्णांसाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांना रोटरी क्लब व महापालिकेतर्फे येथे वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रसन्ना खाजगीवले यांनी दिली.
नगरमधील आय लव नगर, जैन ओसवाल युवक संघ, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान, इनर व्हील ऑफ अहमदनगर विनस, विजेता क्रिकेट क्लब, इंटेरियर डेकोरेटर असोसिएशन, आय आय डी या संस्थांही सहकार्य करत असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली.
दररोज सकाळी 7 ते 8 या वेळेत योगासन वर्ग येथे घेतले जातात. रुग्णांना आयुष्य काढा तसेच इतर आयुर्वेदिक औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहेत.
मानसिक स्वास्थ्यासाठी रुग्णांना समुपदेशन केले जात आहे. सर्व रुग्णांना विनामूल्य जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून, दिवसातून दोन वेळा चहा, सकाळी नाश्ता, आणि दोन वेळचे जेवण दिले जात आहे.