पुणे (प्रभात वृत्तसेवा) – कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित पडले आहेत. वारंवार निवेदने देवूनही प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुन्हा एकदा समस्यांचा पाढा वाचला आहे.
केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रलंबित प्रस्तावांवर ठोस कार्यवाही करावी, असा आग्रह संघटनेने अधिकाऱ्यांकडे धरला आहे.संघटनेचे अध्यक्ष प्रा.संतोष फाजगे, सरचिटणीस प्रा.लक्ष्मण रोडे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.तुकाराम साळुंखे, उपाध्यक्ष प्रा.किरण खाजेकर, समन्वयक प्रा.विक्रम काळे, सल्लागार प्रा.एस.टी.पवार आदींनी शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक, सहाय्यक संचालक मीना शेंडकर यांची भेट घेतली व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत 16 जून रोजी दिलेल्या पत्राचा पाठपुरावा घेण्यासाठी सविस्तर चर्चा केली.
प्रामुख्याने निवड श्रेणी व नियमित वेतनश्रेणी, शालार्थ आयडी, नैसर्गिक तुकडी वाढ, सेवाखंड क्षमापित करण्याबाबतचे प्रलंबित प्रश्न, नवीन विषय सुरू करण्याचे प्रस्ताव, सेवा दाखले, वैद्यकीय बिलांचे प्रस्ताव, फरक बिले इत्यादींबाबतआढावा घेतला. नियमित वेतन व निवड वेतनश्रेणीचे बरेचसे प्रस्ताव मान्य केले आहेत व काही प्रस्ताव त्रुटी असल्याचे संबंधितांना कळविले आहे.
शालार्थ आयडी मिळवण्यासाठीचे माध्यमिक शिक्षकांचे प्रस्ताव मान्य केले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रस्ताव शिफारस करून पुणे विभागीय बोर्डाच्या अध्यक्षांकडे सुपूर्त केले आहेत.
विविध प्रकारची फरक बिले करोनाच्या लॉकडाऊनामुळे व बीडीएस 27 मार्चला बंद झाल्यामुळे काढता आलेली नाहीत. त्यासाठीचे बजेट शासन आदेश येताच शासनाला कळविले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वैयक्तिक मान्यतांबाबतच्या शिबिरा मधील प्रस्तावावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.
याबाबतही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 4 मे रोजी शासन आदेश आल्याने त्याला स्थगिती दिली होती. परंतु आत्ता त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश आल्याने सप्टेंबर अखेरपर्यंत वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.