पाचगणी (प्रतिनिधी) – जागेच्या मोजणीत चुकीच्या हद्दी दाखवून काम करत असल्याच्या आरोपावरून महाबळेश्वर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातीत कर्मचारी रवींद्र फाळके यांना माजी नगरसेवक संजय पिसाळ यांनी मारहाण केली. या प्रकरणी फाळके यांच्या तक्रारीवरून चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पिसाळ यांना अटक न झाल्याने भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यानी काम बंद आदोलन सुरू केले आहे.
तापोळा येथील जमिनीच्या हद्दीच्या खुणा कायम करण्यासाठी रवींद्र फाळके व दीपक मांढरे हे गेले असता, संजय पिसाळ व त्यांचा भाऊ राहुल पिसाळ यांनी फाळके यांना शिवीगाळ, दमदाटी करून, हाताने कानशिलात व डोक्यावर मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, संजय पिसाळ यांना अटक न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात कर्मचारी आंदोलन करतील, असा इशारा महाबळेश्वरचे भूमी अभिलेख उपअधीक्षक सचिन वाघ यांनी दिला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बिद्री तपास करत आहेत.