पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल
सुपा – पारनेर तालुक्यातील सुपा येथील म्हसणे फाटा परिसरात नव्याने सुरू झालेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारी मिळण्यावरून पुन्हा एकदा दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी वाडेगव्हाण परिसरात दोन गटात खोऱ्याचे दांडके, स्टंप, तलवारीने दोन गट एकमेकांना भिडले. या राड्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
याबाबत सुपा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अविनाश सुभाष ढोरमले (वय 37, धंदा- बांधकाम व्यवसाय, रा. जातेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे, अविनाश ढोरमले हे त्याच्या मित्राची गाडी क्रमांक (एम.एच-12 के.जे 5600) या गाडीमध्ये बसुन शिरूर येथे जात असताना वाडेगव्हाण गावच्या पुढे नितीन पांडुरंग शेळके, किशोर यादव, अजय शेळके, विजय शेळके, गणेश कोहकडे, गोरख मोटे, राहुल यादव रा.यादववाडी,ता.पारनेर) अक्षय कचरे, संदिप चौधरी, सचिन पांडुरंग शेळके (रा.वाडेगव्हाण ता.पारनेर) यांच्या सह इतर 5 ते 6 जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून गाडी अडवून ढोरमले यांना खोऱ्याचे दांडके, स्टंपाने उजव्या खांद्यावर दोन्ही मनगटावर व डोक्यावर मारहाण करून दुखापत केली तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, घड्याळ, एक अंगठी, व पन्नास हजार रूपये रोख असे हिसकावून घेवुन ढोरमले यांना शिवीगाळ करून तलवार व पिस्तूलाने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले.
विरोधी गटाचे स्वप्नील शशीकांत सोनवणे (वय-26, धंदा-शेती, रा.वाडेगव्हाण) स्वप्नील याने कारचा ब्रेक मारल्याचे कारणावरून जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. कारमधून 16 तोळे दागिण्यांची पर्स उचलून घेवुन निघुन गेले असल्याचे फिर्यादीवरुन सुहास शेळके,(रा.वाडेगव्हाण), अविनाश ढोरमले (रा.जातेगाव), लकी कळमकर, संतोष तरटे, संजय तरटे (रा.पळवे ता. पारनेर) यांच्या सह 3 ते 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलो. पुढील तपास सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस करत आहेत.