पाटण -अत्यावश्यक सेवामध्ये समाविष्ट असणाऱ्या आरोग्य विभागाचा कारभार निद्रिस्त झाला आहे. शनिवार, रविवार अथवा शासकीय सुट्टीच्या दिवशी आरोग्य अधिकारी कर्मचारी हे आरोग्य केंद्रात गैरहजर असल्याचे समोर आले आहे. परिणामी अत्यावशक सेवेपासून रुग्णांना वंचित राहावे लागत आहे. पाटण तालुक्यात आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा ‘मृत्यू’ मात्र स्वस्त झाला आहे.
पाटण तालुक्यात तेरा प्राथमिक आरोग्य केंद्र तर जवळपास 64च्या पेक्षा जास्त आरोग्य उपकेंद्रे आहेत. आरोग्याची सेवा 24 तास मिळावी, या हेतूने उभारण्यात आलेली आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विना ओस पडू लागली आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास उपलब्ध असावे, असा नियम आहे. मात्र, पाटण तालुक्यात या नियमाची पायमल्ली होत आहे. एकही वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे.
भौगोलिक परिस्थिती अडचणीची असणाऱ्या पाटण तालुक्यात आरोग्य विभागाचा कारभार तितकासा चांगला राहिला नाही. प्रत्येक आरोग्य केंद्रांना दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. मात्र, तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभार एका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे. मात्र, इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी रुग्णांना सेवा देतात. शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी हे अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात नसतात. वास्तविक आरोग्य केंद्रातील ओपीडीला रविवारी सुट्टी असते, मात्र, सलग दोन दिवस रुग्णालय बंद ठेवता येत नाही.
परंतु, मागील शनिवारी व रविवारी सुट्टी होती. तर सोमवारी गुरुनानक जयंती असल्याने तीन दिवस पाटण तालुक्यातील सोनवडे, मरळी व मोरगिरी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी गायब होते. याबाबत आरोग्य केंद्रात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्याच्याकडून डॉक्टर तीन दिवसांपासून आलेले नाहीत, असे सांगण्यात आले.त्यामुळे येथील आरोग्य सेवेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून येथील अत्यावस्थ रूग्णांचे मरण स्वस्त झाले आहे.
याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होते आहे. दरम्यान, हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात काही दिवसांपूर्वी नवजात बालक मृत्यू पावले होते. यावेळी संबंधित बालकाच्या पालकांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप केला होता. तर सामाजिक संघटनांनी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आंदोलन उभारले होते, ही घटना ताजी असतानाच आरोग्य विभागाने कामात सुधारणा करणे अपेक्षित आहे. मात्र, वरिष्ठांच्या “अर्थपूर्ण’ तडजोडीमुळे खाली काम करणारे आरोग्य अधिकारी कर्मचारी ‘मोकाट’ असल्याचा आरोप होत आहे.
“आशां’ वर आरोग्याचा भार…
पाटण तालुक्यात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा दूत म्हणून काम पाहत आहेत. येथील आरोग्य विभागाचा भार आशा स्वयंसेविकांवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य सेवक व आरोग्य सेविका हे केवळ पदा पुरते काम पाहत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर आठवड्याची माहिती अपडेट करण्याचे काम केवळ या आरोग्य सेविका व सेवक करत आहेत.
पाटण तालुक्यातील सोनवडे, मरळी व मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्र सलग तीन दिवस बंद असेल तर संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाणार आहे.
अनिरुद्ध अठलये,
जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा.