नवी दिल्ली – ओडिशातील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लेखश्री सामंतसिंहर यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा देत बिजू जनता दलात प्रवेश केला. लोकसभा व विधानसभा निवडणुक काळात भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. लेखश्री या भृगु बक्षीपात्रा यांच्यानंतर भाजपच्या दुसऱ्या ओडिशा उपाध्यक्ष आहेत. ओडिशा भाजपचे अध्यक्ष मनमोहन सामल यांना दिलेल्या राजीनामा पत्रात लेखश्री यांनी म्हटले आहे की, नेतृत्वाचा विश्वास संपादन करण्यात अपयश आल्याने आपण भाजप सोडण्याचा निर्णय घेतला.
गेल्या दहा वर्षांपासून मी माझा घाम आणि रक्त भारतीय जनता पक्षाला दिले आहे. मात्र, प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रम करूनही मी नेतृत्वाचा विश्वास संपादन करू शकले नाही. त्यामुळे माझ्याकडे आता काहीच उरले नाही, असे मला वाटते. लेखश्री यांनी रविवारी पक्षाचे खासदार मानस मंगराज आणि सस्मित पात्रा यांच्या उपस्थितीत बीजेडीमध्ये प्रवेश केला.
मला स्वीकारल्याबद्दल मी बीजेडीचे आभार मानते, मी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या विकासात्मक उपक्रमांनी प्रेरित आहे. मी बीजेडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन,असे त्या म्हणाल्या. बीजेडीचे राज्य मुख्यालय असलेल्या ‘संखा भवन’ येथे त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
बीजेडीने अद्याप बालासोर लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नसल्यामुळे,त्या जागेवर लेखश्री यांना उमेदवारी मिळू शकते असे सांगितले जात आहे.