मुंढवा, (मनोज गायकवाड) –पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर केशवनगरमधील बहुसंख्य नागरिकांनी आपल्या हरकती हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात नोंदविल्या आहेत. यात प्रामुख्याने येथील प्रभागाचे नाव बदलावे. तसेच, केशवनगर गावाचे तुकडे करू नयेत, अशा विविध हरकती असल्याचे तसेच यावर योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर संपूर्ण गाव मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याचे केशवनगरचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश राऊत यांनी सांगितले. याबाबत केशवनगर नागरी कृती समितीने हडपसर क्षेत्रीय अधिकारी प्रसाद काटकर यांना लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी कॉंग्रेस पक्षाचे हडपसर उपाध्यक्ष रमेश राऊत, दादा अहिरे, विकी माने, शिवसेनेचे दिलीप व्यवहारे, संतोष शिंदे, अनिल लोणकर, नंदकुमार लोणकर, नीळकंठ माणिकशेट्टी, सुरज मोराळे, दत्तात्रय भंडारी, अजय जाधव, गणेश काकडे, गणेश ससाणे, विक्रम लोणकर, अंबादास दंडाले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
राजकारणातून केशवनगरचा “बळी’
पुणे महानगरपालिकेत केशवनगर गाव जाऊन साडे चार वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, रस्ते, पाणी, स्वच्छता अशा मुलभूत सुविधाही पालिकेकडून पुरविल्या जात नाहीत. अशा स्थितीतही पालिकेला वाढीव मिळकतकर भरावा लागत आहे. नवीन नगरसेवक येतील आणि केशवनगरचा विकास करतील, अशी अपेक्षा होती. परंतु, विचीत्र प्रभागरचनेमुळे नागरिकांच्या अपेक्षेवर अक्षरशः पाणी पडले आहे. राजकारणातून केशवनगरचा बळी दिला गेल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू असून याच थेट परिणाम मतदानावर होणार आहे, असे नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत.
नागरिकांचे म्हणणे असे आहे…
केशवनगर प्रभागासाठी नागरिकांनी तीन पर्याय सुचविले आहेत.
1. मुंढवा (16153) + केशवनगर (29965)+ भापकरमळा पर्यंतचा मांजरीचा भाग (17000) एकूण 63,118 मतदार संख्या.
2. केशवनगर (29965)+मांजरी संपूर्ण (35000) एकूण 64965 मतदार संख्या.
3. मुंढवा (16153) + केशवनगर (29965)+ साडेसतरानळी (15000) एकूण 61118 मतदार संख्या.
या तीन पर्यायापैकी कोणताही एक पर्याय निवडावा. यात नैसर्गिक हद्द, रेल्वेलाइन, बायपास व नदी या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.