पुणे -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या आराखड्याबाबत हरकती व सूचना नोंदविण्यासाठी पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये 15 सप्टेंबरपर्यंत कॉंग्रेस भवन येथे नागरिकांच्या हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहे. त्याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी तालुकानिहाय वकिलांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने कॉंग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष तसेच आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पीएमआरडीएच्या आराखड्याच्या हरकती व सूचना नोंदविण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत कॉंग्रेसचे जिल्हा विधी विभागाचे अध्यक्ष ऍड. राहुल ढाले तसेच भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर, पुरंदर, दौंड येथील ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते. जिल्हा कॉंग्रेस तर्फे पीएमआरडीए आराखड्याच्या संदर्भात हरकती करण्यासंदर्भात विधी विभागातर्फे मोफत सल्ला व मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी पुणे कॉंग्रेस कमिटीच्यावतीने कॉंग्रेस भवनात पहिल्या मजल्यावर विधी विभागाची कचेरी उघडण्यात आली आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते पाच या वेळेत नागरिकांच्या हरकती स्वीकारण्यात येणार आहे. तसेच मोफत कायदेशीर सल्ला देण्यात येणार आहे. या करिता काही तालुक्यांसाठी वकिलांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.