मुंबई – ओबीसींचे 27 टक्के राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे स्थगित झालेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा नवीन कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुका आता 18 जानेवारीला होणार असून 19 जानेवारीला तेथे मतमोजणी होणार आहे. उर्वरीत निवडणुका ठरल्याप्रमाणे 21 डिसेंबरला होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे.
ओबीसींसाठी आरक्षीत जागा रद्द करून त्या जागा ओपन मधून भरल्या जाणार आहेत. त्यानुसार या जागांवर 18 जानेवारीला मतदान घेतले जाणार आहे. तेथील मतमोजणी आणि 21 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 19 जानेवारीला होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 106 नगरपंचायती, भंडारा आणि गोंदीया या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 15 पंचायत समितीच्या निवडणुका 21 डिसेंबर रोजी होणार होत्या. त्याच बरोबर चार महापालिकांतील चार, आणि 4 हजार 554 ग्राम पंचायतीतील 7 हजार 130 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकाहीं 21 डिसेंबरला होणार होत्या. मात्र 6 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील जागा रद्द ठरवल्याने त्या जागांच्या स्वतंत्र निवडणुका 18 जानेवारीला घेतल्या जातील.