नवीन वर्षांत साखर उद्योगात निवडणुकांची धुराडी पेटणार : भाजपची प्रतिष्ठा पणाला
नीलकंठ मोहिते
रेडा- इंदापूर तालुक्यात दुसऱ्यांदा आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून निवडणूक जिंकली. एकीकडे राष्ट्रवादीमधून भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा तब्बल अर्धा डझन मातब्बर नेत्यांनी दिला होता. तरीदेखील आमदार भरणे यांनी केवळ पक्षाच्या जीवावर व सामान्य जनतेच्या जोरावर विधानसभेचा गड काबीज केला. दुसऱ्यांदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांना विधानसभेला पराभवाला सामोरे जावे लागले. पाटील हे मागील कालावधीत कॉंग्रेसचे राज्यातील मोठे नेते होते. त्यामुळे राष्ट्रवादीतून कारखाना निवडणुकीसाठी मदत केली जात होती. मात्र, हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेल्याने एप्रिलमध्ये होणाऱ्या इंदापूर तालुक्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ताकदीने निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादी काबीज करणार का, अशी चर्चा होत आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये माजी सहकारमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना व बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना हे दोन सहकारी तत्त्वावरील कारखाने आहेत. पाटील यांना जरी मागील विधानसभेला पराभवाला सामोरे जावे लागले तरी देखील आपल्या आधिपत्याखालील दोन्ही सहकारी साखर कारखाने आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी यशस्वी ठरले होते. त्या कालावधीत पाटील हे कॉंग्रेसचे नेते असल्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते इंदापूर तालुक्यातील नेत्यांना या कारखान्यांच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष करा, असे आदेश सातत्याने येत असल्याने काही कार्यकर्त्यांच्या निवडणूक लढवण्याचा भावना कोमेजून गेल्या होत्या. या दोन्ही कारखान्याची निवडणूक कोणालाही मनापासून लढवता आली नाही. मात्र, पाटील हे भाजपात प्रवेश केल्याने कारखान्यांच्या निवडणुका लागणार, हे निश्चित झाले आहे.
बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे सभासद एकवीस हजारांच्या आसपास आहेत. नीरा भीमा कारखान्याचे सभासद अवघ्या पंधराशेच्या आसपास आहेत. बिजवडी व नीरा भीमा कारखाना या दोन्ही कारखान्यांकडे सभासद होण्यासाठी हजारो अर्ज पेंडिंग आहेत. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिपत्याखाली असणारे जे साखर कारखाने आहेत. या कारखान्यांचा दर सभासदांना अधिकचा दिला जातो.
इंदापूर तालुक्यातील या दोन सहकारी साखर कारखान्यांचा दर कमी प्रमाणात शेतकऱ्याला मिळतो आहे. ही सल शेतकरी सभासदांना बोचत आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याचे कार्यक्षेत्र जवळपास 72 गावांचे आहे. या कारखान्याला सर्वात जवळची ऊस वाहतूक करता येते. तरीदेखील शेतकऱ्याच्या मनाप्रमाणे दर मिळत नाही. कामगारांचा वेळेत पगार होत नाही. कारखान्यावरील कर्ज फिटत नाही. त्यामुळे अनेक समस्यांनी हा कारखाना ग्रासला आहे. कारखान्याच्या समस्यांमुळे कार्यक्षेत्रातील गावातून आमदार भरणे यांना मताधिक्य देऊन शेतकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.
नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना हा योग्यरितीने चालत असल्यामुळे शेतकरी सभासद अद्यापि कोणतीही नाराजी व्यक्त करीत नाहीत. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांना यंदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करता येणार नाही, हे निश्चित आहे. तरी कारखान्याकडे सभासद होण्यासाठी तीन ते चार हजार शेतकऱ्यांची वेटिंग लिस्ट प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना हक्काचे सभासद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये नीरा भीमा कारखाना व कर्मयोगी कारखाना कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये कर्मयोगी कारखान्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवणार, यासाठी प्राथमिक तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सुरू असल्याचे दिसत आहे.
- भाजपला पाठिंबा दिलेले नेते तग धरणार का?
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भाजपच्या चिन्हावर लढताना थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील मातब्बर यांनी पाठिंबा देत निवडणुकीत मोठी मेहनत हर्षवर्धन पाटलांसाठी घेतली. मात्र तितके यश पदरात पडले नाही. जे नेते हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी फक्त पाठिंबा म्हणून मदत करत होते. ते नेते दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्यामागे खंबीर उभे राहतील का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.