नवी दिल्ली – भारतातील सगळ्यांत जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेकडून देणग्या गोळा करण्याचे अभियान सुरू केले आहे आणि त्याचसोबत आपल्या शंभर वर्षांपूर्वीच्या अशाच अभियानाच्या स्मृतींना उजाळाही दिला आहे. १९२०-२१ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही असेच निधी संकलनाचे अभियान सुरू केले होते. टिळक स्वराज कोष असे त्यावेळी या अभियानाचे नाव होते. आताचे निधी संकलन अभियानही त्यावरूनच प्रेरीत असल्याचे मानले जाते आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या १३८ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देण्याचे अभियान कॉंग्रेसकडून सुरू करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत कर्नाटक आणि त्यानंतर तेलंगणा अशा दक्षिण भारतातील दोन राज्यांत कॉंग्रेसची सरशी झाली. त्यानंतर पक्ष आता लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागला आहे. तथापि, पक्षनिधीच्या बाबतीत बोलायचे झाले तर आपला कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीपेक्षा कॉंग्रेस याबाबतीत खूपच मागे आहे. ती तूट भरण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
काय आहे टिळक स्वराज कोष?
थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीनिमित्त कॉंग्रेसने १९२० मध्ये नागपूर येथे टिळक स्वराज फंड लॉंच केले होते. १९२० च्या ऑगस्ट महिन्यातच लोकमान्य टिळकांचे निधन झाले होते. कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांपैकी ते एक होते व विशेष म्हणजे टिळक युगाचा अंत झाल्यावर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधी युगाची सुरूवात झाली असे म्हटले जाते.
स्वराज्य प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या असहकार आंदोलनाकरता निधी प्राप्त करणे हा टिळक स्वराज फंडचा मुख्य उद्देश होता. एप्रिल ते जून १९२१ हे अभियान चालवण्यात आले होते आणि त्या काळात १ कोटी रूपये जमा करण्याचे उद्दिष्ट तेंव्हा ठेवण्यात आले होते. मुंबईतील ६० लाख रूपये आणि देशाच्या उर्वरित भागातून ४० लाख रूपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले गेले होते. जून महिन्याच्या अखेरपर्यंत आपले १ कोटी रूपयांचे लक्ष्य साध्य करण्यात कॉंग्रेसला यश आले होते.
आज काय आहे कॉंग्रेसची स्थिती?
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज पक्षनिधीच्या बाबतीत कोणताही राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टीच्या जवळपासही नाही. २०१३-१४ मध्ये भाजपचे जेंव्हा सरकार आले तेंव्हा पक्षाकडे ७८१ कोटी रूपये निधी होता. तो २०२१-२२ मध्ये ६०४७ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे.
२०१३-१४ मध्ये देशातील सगळ्यांत जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडे ७६७ कोटी रूपयांचा निधी होता. २०१९-२० पर्यंत तो ९२९ कोटींपर्यंत पोहोचला. २०२१-२२ मध्ये हाच ८०६ कोटी रूपये होता. २०२१ मध्ये जनतेकडून देणगी आणि इलेक्टोरल बॉंडच्या माध्यमातून कॉंग्रेसला ५४१ कोटी रूपये मिळाले. तर याच माध्यमातून भाजपला १९१७ कोटी रूपये मिळाले.
राजकीय पक्षांनी २०१७ पासून इलेक्टोरल बॉंडच्या माध्यमातून निधी स्विकारण्यास सुरूवात केली. तेंव्हापासून आतापर्यंत या बॉंडच्या माध्यमातून जो काही निधी राजकीय पक्षांना मिळाला आहे तर एकट्या भारतीय जनता पार्टीचा वाटा ५७ टक्क्यांचा आहे. कॉंग्रेसला केवळ १० टक्के निधी प्राप्त झाला आहे. २०१७ ते २०२२ या काळात एकूण ९,२०८.२३ कोटी रूपयांच्या बॉंडची विक्री झाली. यातील ५,२७१,१७ रूपयांचे बॉंडला भाजपला तर ९५२.२९ कोटी रूपयांचे बॉंड भाजपला मिळाले.