ढाका : बांगलादेशच्या चलनाच्या मूल्यात (टका) सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण झाला आहे. खुद्द अर्थ मंत्रालयाच्याच एका पत्रकात ही गोष्ट सांगितली आहे. सरकारच्या 2023-24 ते 2025-26 या वर्षांच्या आर्थिक धोरणाशी संबंधित या दस्तऐवजात अशा अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यात अर्थव्यवस्था सुधारण्याविषयी इशारे देण्यात आले आहेत.
बांगलादेशातील वाढत्या आर्थिक समस्यांपैकी एक वीज सबसिडीशी संबंधित आहे. अमेरिकन डॉलर एक टकाही महाग झाल्यास सरकारचा विजेवरील अनुदान खर्च 474 कोटी रुपयांनी वाढेल, असा इशारा सरकारी निवेदनात देण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात टका आणखी 10 टक्क्यांनी घसरल्यास सरकारचे कर्ज 3,800 कोटी रुपयांनी वाढेल.
इतर देशांप्रमाणे बांगलादेशनेही आपली बहुतांश कर्जे डॉलरमध्ये घेतली आहेत. त्यामुळेच डॉलर महाग झाल्याने नवीन कर्ज न घेताही विविध देशांवरील कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. आता बांगलादेशातही ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. डॉलरच्या तुलनेत टकाच्या अवमूल्यनामुळे अनुदानाचा खर्च, कर्जाची परतफेड आणि प्रकल्प राबविण्याच्या खर्चात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
टका मूल्यात नुकत्याच झालेल्या तीव्र घसरणीमुळे बांगलादेशसाठी आयात महाग झाली आहे. याशिवाय, आधी घेतलेल्या कर्जाची (मुद्दल आणि व्याज) परतफेड करण्यासाठी त्याला अधिक रक्कम खर्च करावी लागेल.