शेवगाव – शेवगावात जातीय दंगल होऊन एक महिनाही पूर्ण झाला नाही तोच औरंगजेबाचे स्टेट्स ठेवले म्हणून शेवगाव शहरात तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी तातडीने स्टेट्स ठेवणाऱ्या दोन तरुणांविरुध्द गुन्हा दाखल केल्याने तणाव निवळला. रेहान मुबारक सय्यद (वय 19) व रिजवान मुबारक सय्यद (वय 19 दोन्ही रा.इदगाह मैदान शेवगाव) अशी स्टेट्स ठेवणाऱ्या आरोपींची नावे असून दोघे जुळे बंधू आहेत. पो.कॉ. बप्पासाहेब धाकतोडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करुन दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या गुन्ह्यात आरोपी असलेल्या तरुणांनी त्यांच्या मोबाईलवर दि. 8 जून रोजी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी औरंगजेबाचा व्हीडीओ व्हॉटसअपचे स्टेटसवर ठेवून दृश्य देखावा तयार करुन त्यामध्ये सब के पाया औरंगजेब आलमगीर असा व्हिडीओ टाकुन हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतुने दोन समाजामध्ये वाद निर्माण होवुन शत्रुत्व निर्माण होईल या द्वेष भावनेने औरंगजेबाचा व्हीडीओ स्टेटसला पोस्ट करून प्रसारीत केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पो. ना. सुखदेव धोत्रे हे करीत आहे.
दरम्यान, शहरात 14 मे रोजी उसळलेल्या जातीय दंगलीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना हा प्रकार घडल्यामुळे नागरीकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जातीय तणाव वाढावा, यासाठी कोणी जाणीवपूर्वक खतपाणी घालून प्रोत्साहन देत आहे का? याचा पोलिसांनी शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.