पुणे – कारागृहातील बंदीवानांना नातलगांसोबत संवाद साधण्यासाठी कॉईन बॉक्सऐवजी स्मार्ट कार्ड मोबाइलद्वारे संवाद साधता येणार आहे. प्रायोगिक तत्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृहात सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी चांगल्या रितीने झाल्यास संपूर्ण राज्यात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांसाठी प्रायोगिक तत्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित सुविधेचे उदघाटन गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बंदीवानांना नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉईन बॉक्स सुविधा आहे; परंतु कॉईन बॉक्स सद्यस्थितीत बाजारात उपलब्ध होत नाहीत.
कॉईन बॉक्स नादुरुस्त झाल्यास दुुरुस्ती करून मिळत नाही. त्यामुळे बहुतांशी सुविधा बंद झाल्यामुळे बंदीवानांना नातलगांसोबत संवादाला आडकाठी निर्माण झाली होती. त्याशिवाय अति सुरक्षा विभाग, सुरक्षा यार्ड व विभक्त कोठड्यांमधील बंद्यांनाही नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉईन बॉक्स असलेल्या ठिकाणी न्यावे लागत होते. त्यामुळे कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक ठरण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर काही कारागृह अधिक्षकांनी कॉईन बॉक्सऐवजी साधे मोबाइल वापरण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुप्ता यांनी कारागृहात प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू करण्याची शिफारस शासनाकडे केली होती.
महिन्यातून तीन वेळा संधी
प्रस्तावाला शासनाने मान्यता दिल्यानंतर ऍलन ग्रुप, एल-69 तमिळनाडू यांच्या वतीने शुक्रवारपासून कारागृहातील बंद्यांना पात्रतेनुसार महिन्यातून तीन वेळा प्रत्येकी 10 मिनिटांसाठी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बंद्यांना स्वतःच्या कुटुंबीयांशी संपर्क साधणे सोईस्कर झाले आहे.