आता स्टॅम्प पेपरसाठी मारामार; मागणीपेक्षा पुरवठा कमी

पुणे -शहरात मागील दोन दिवसांपासून 100 व 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा जाणवत आहे. स्टॅम्प पेपर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

कसबा पेठ परिसरातून पोलिसांनी एका स्टॅम्प पेपर विक्रेत्याकडून 100 रुपये व 500 रुपयांच्या स्टॅम्पवर शिक्के नसलेले सुमारे 67 लाख रुपयांचे स्टॅम्प जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, हा घोटाळा समोर आल्यापासून शहरामध्ये स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या स्टॅम्प पेपर मागणीपेक्षा कमी दिले जात असल्याने हा प्रश्‍न निर्माण होत असल्याचे एका विक्रेत्यांने सांगितले.

कसबा पेठ येथील देशपांडे स्टॅम्प पेपर विक्रेत्याने कोषागार अधिकारी प्रथम व मुद्रांक लिपिक कोषागार पुणे करीता असा बनावट शिक्का तयार केला होता. ते शिक्का 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर उमटवून त्याचा गैरवापर करीत असल्याचे चौकशीत समोर आले. हा प्रकार समोर आल्यानंतर कोषागार कार्यालयात खळबळ माजली आहे. प्रत्येक स्टॅम्प पेपर विक्रेत्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.

भाडेकरार, संमतीपत्र, शपथपत्र, बॅंक कर्ज, शेअर्सचे हस्तांतरण आणि शैक्षणिक आदींसाठी 100 व 500 रुपयांचे स्टॅम्पची आवश्‍यकता भासते. त्याचबरोबर सध्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विविध दाखले काढावी लागत असून, त्यासाठी शासनाला स्टॅम्प पेपरवर शपथपत्र द्यावे लागते. त्यामुळे सध्या स्टॅम्प पेपरला मागणी वाढली आहे. स्टॅम्प पेपर घेण्यासाठी नागरिकांना विविध ठिकाणी फिरावे लागत आहे. तसेच स्टॅम्प पेपर घेण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहे.

जिल्हा कोषागार कर्मचाऱ्यांची चौकशी 
जिल्हा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पोलीस चौकशीसाठी जावे लागते. त्यामुळे कार्यालयात अपुरे मनुष्यबळ असल्याने स्टॅम्प पेपर देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. येत्या दोन दिवसांत ही परिस्थिती सुधारेल आणि स्टॅम्प विक्रेत्यांना सुरळीतपणे स्टॅम्प मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.