नीरा-देवघरच्या पाण्यासाठी ठिय्या

फलटण – नीरा देवघर धरणाचे पाणी नीरा उजवा कालव्याद्वारे पूर्ववत लाभक्षेत्रातील 36 गावांना मिळणार का? आणि कसे मिळणार या संबंधी यापूर्वी निवेदनाद्वारे दिलेल्या प्रश्‍नाचे उत्तर 10 दिवस उलटून गेल्यावरही दिलेले नसून उत्तर कधी देणार याचा जाब विचारत आ. दीपक चव्हाण आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नीरा उजवा कालवा कार्यालयात मोर्चा काढून ठिय्या ठोकला.

नीरा देवघरचे बारामतीला जाणारे पाणी बंद केल्यानंतर हे पाणी 12 जून 19 रोजी शासनाने नवीन काढलेल्या पत्राप्रमाणे फलटण तालुक्‍यातील नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील 36 गावांना पुर्वीप्रमाणे मिळणार का? आणि नीरा देवधरचे पाणी कसे वाढवून मिळणार याची माहिती द्यावी, असे निवेदन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी नीरा उजवा कार्यालयात येऊन दि. 15 जून रोजी पाणी वापर संस्थेच्यावतीने दिले होते.

यावर संबंधित अधिकाऱ्यांनी 8 दिवसात उत्तर देतो असे त्यावेळी स्पष्ट केले होते. मात्र यावर काहीच उत्तर न मिळाल्याने संतप्त पाणीवापर संस्थेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत निरा उजवा कार्यालयात येऊन अधिकारी वर्गाला जाब विचारला. मात्र नेहमीप्रमाने या कार्यालयात कोणीच वरिष्ठ अधिकारी नसल्याने संतप्त आंदोलकांनी ठोस आणि लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय कार्यालयातून उठणार नसल्याच्या इशारा दिला आ. दीपक चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत फोनवरुन संबधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावेळी महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनीही तालुक्‍यात दुष्काळी परिस्थितिचे अधिकारी वर्गाला गांभीर्य नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

अखेर कार्यकारी अभियंता अमोल निकम यांनी 27 रोजी ठोस लेखी उत्तर देऊ असे लेखी पत्र आंदोलकास देण्यास कार्यालयातील अधिकारी वर्गाला सांगितले आणि ते पत्र मिळाल्यावर आंदोलक शांत झाले. यावेळी महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष भगवानराव होळकर, वसंतराव गायकवाड़, सचिन रणवरे, भीमदेव बुरुंगले आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.