मुंबई – मॉडर्नापाठोपाठ अमेरिकेत लस निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या करोनाविरोधी लसीच्या सध्या मानवी चाचण्या सुरू आहेत. नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या प्रायोगिक लसीचे पहिल्या टप्प्याच्या मानवी चाचणीचे निष्कर्ष खूपच समाधानकारक आहेत.
एनव्हीएक्स-सीओव्ही 2373 या लसीचे दोन डोस दिल्यानंतर तंदुरुस्त स्वयंसेवकांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार झाल्या. करोनामुक्त नागरिकांच्या शरीरात आढळणाऱ्या अँटीबॉडीजपेक्षा हे प्रमाण जास्त होते, असे कंपनीने म्हटले आहे. 18 ते 59 वयोगटातील तंदुरुस्त स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली. त्यांना 5 आणि 25 मायक्रोग्रॅमचे दोन डोस देण्यात आले. लस दिल्यानंतर कोणावरही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत, असे नोव्हाव्हॅक्सने सांगितले. त्यामुळे या लसीबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
पहिला डोस दिल्यानंतर सर्वांच्या शरीरात स्पाइक प्रोटीनला रोखणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्या. स्पाइक प्रोटीनच मानवी पेशींमध्ये घुसखोरी करतो. त्यामुळे रुग्णाची प्रकृती ढासळू लागते. व्हायरसला पेशींवर आक्रमण करण्यापासून रोखणाऱ्या या अँटीबॉडीज तयार झाल्यावर 28 दिवसांनंतर दुसरा डोस दिला गेला. त्यावेळी रोगप्रतिकारकशक्ती मोठ्या प्रमाणावर वाढली. नोव्हाव्हॅक्सचे हे संशोधन लवकरच मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होईल.
सप्टेंबरच्या अखेरीस नोव्हाव्हॅक्सच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या सुरू होतील. 2021 या वर्षात एक अब्ज ते दोन अब्ज लसीचे डोस बनवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. अमेरिकेने करोनावरील लस निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीला 1.6 अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली होती.
नोव्हाव्हॅक्सची लस यशस्वी होणे, भारतासाठीसुद्धा आनंदाची बाब आहे. कारण नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत करार केला आहे. या करारामुळे नोव्हाव्हॅक्सच्या भारतातील लस उत्पादनाचे सर्वाधिकार सिरमकडे असणार आहेत. या करारामुळे सिरम भारतासाठी नोव्हाव्हॅक्सच्या लसीचे उत्पादन करणार आहे.