महाबळेश्वर – ब्रिटीश गव्हर्नर यांच्या माउंट मालकम या बंगल्याचा हेरिटेज दर्जा बदलण्यात आला असून या बदलाला अंतिम स्वरूप देण्याची जबाबदारी वारसा स्थळ जतन समितीने पालिकेवर सोपविली आहे. त्यानुसार या बदलाला अंतिम स्वरूप देण्यासाठी पालिकेने वर्तमान पत्रात नोटीस प्रसिध्द करून नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. दरम्यान पालिकेच्या सभागृहात या मिळकतीबाबत कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत मुख्याधिकारी यांना अशा प्रकारे नोटीस काढण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी ही काढलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा आरोप नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी केला आहे.
नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी हेरिटेज समिती निर्णयाला हरकत घेतली असून हेरिटेज समिती व मुख्याधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की कोणत्याही मिळकतीचा दर्जा बदलण्याचा प्रस्ताव पालिकेकडून हेरिटेज समितीकडे गेला पाहिजे. परंतु या प्रकरणात मिळकत धारकाने हा प्रस्ताव थेट समितीकडे सादर केला आहे.
हेरिटेज समितीचे काम वारसा स्थळाचे जतन व संवर्धन करणे आहे. परंतु, या प्रकरणात समिती आपल्या कर्तव्यापासून भरकटली आहे. समितीने धनिकाचे हित जोपासणारा निर्णय घेतला आहे ही इमारत पाडुन या मिळकती मधील चटई क्षेत्र इतर ठिकाणी वापरण्याची मुभा दिली आहे. समितीचा हा निर्णय वनसंपदेवर घाव घालणार आहे.