वादग्रस्त पुस्तकाचे वितरण थांबवावे

शिवेंद्रसिंहराजे भोसले; अतिउत्साहींना आवर घालून समज देण्याची मागणी
सातारा (प्रतिनिधी) – पक्षातील अतिउत्साही पदाधिकारी- कार्यकर्त्यांमुळे विरोधकांना पक्षनेतृत्वावर चिखलफेक करण्याची संधी मिळते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी अशा अतिउत्साहींना आवर घालावा. तसेच संबंधित पुस्तकाचे वितरण थांबवावे, अशी मागणी साताऱ्याच्या छत्रपती घराण्यातील वंशज आणि भाजपचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पुस्तकात केल्याने उठलेल्या वादाच्या अनुषंगाने आमदार भोसले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवेंद्रराजे म्हणाले, “”छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि कोणत्याच थोर पुरुषाची, स्वातंत्र्य लढ्यातील विभुतींची इतरांबरोबर तुलना करणे योग्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वेगळी आहे. त्यांनी ती स्वत: निर्माण केली आहे. त्यांनी काम करुन देशवासियांचा विश्‍वास संपादन केला आहे.

भारताची जगभरात प्रतिमा उंचावण्यात ते यशस्वी झालेत, याचा अनुभाव भारतीय नागरिक म्हणून आपण घेतोय. त्यामुळे पक्षातील काही अतिउत्साही पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्यामुळे पक्षनेतृत्वावर चिखलफेक करण्याची संधी विरोधकांना मिळते.” त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा. त्यांना योग्य ती समज द्यावी, असे त्यांनी सांगितले. नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर, प्रेम, निष्ठा आहे, ती जपण्याचे काम पक्ष नेतृत्वाने व इतरांनीही करावे. नेतृत्वाला कुठेतरी गालबोट लागेल, असे वर्तन पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी करु नये, असे आवाहन करून भाजप नेतृत्वाने “आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे वितरण थांबवावे, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी केली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत ते म्हणाले, “आपण खासदार आहात, अनुभवी आहात, पत्रकार आहात, त्यामुळे भाषा जपून वापरावी. आपला मानसन्मान आहे, वयाने ज्येष्ठ आहात, त्यामुळे काहीही बोलण्याचा अधिकार आहे, असं समजू नये.’ भाषण, विचार स्वातंत्र्य असले तरी योग्य भाषा वापरावी, असा इशाराही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला.

उदयनराजेंची आज पुण्यात पत्रकार परिषद
गोयल यांच्या वादग्रस्त पुस्तकासंदर्भात राज्यव्यापी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज व माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गोयल यांच्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवरायाबरोबर केलेल्या तुलनेमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. या पुस्तकांची माहिती घेऊनच मी भूमिका मांडणार असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. त्यासाठी पुण्यातील रेसिडेन्सी क्‍लबमध्ये मंगळवारी दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता उदयनराजे पत्रकार परिषद घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.