पोलीस शिपायासह 50 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले
बारामती (प्रतिनिधी) – येथील तालुका पोलीस ठाण्यातील फौजदार बाळासाहेब भीमराव जाधव (वय 54, मूळ रा. पंढरपूर) व पोलीस शिपाई अजिंक्य लहू कदम (नेमणूक बारामती तालुका पोलीस ठाणे) यांना 50 हजारांची लाच स्विकारताना काल रात्री रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदारांच्या भावाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी बाळासाहेब जाधव व अजिंक्य कदम यांनी केली होती. यातील 50 हजारांची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना रंगेहात अटक केली. बारामतीतील नेवसे रस्त्यावर हॉटेल ओमसमोर पैसे स्विकारताना त्यांना पकडण्यात आले.
पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योती पाटील, सुनील क्षीरसागर यांच्यासह पोलिस कर्मचारी दीपक टिळेकर व गणेश भापकर यांनी ही कारवाई केली. बाळासाहेब जाधव यांची गेल्याच महिन्यात जेजुरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती व त्यांना गेल्या शनिवारीच बारामती तालुका पोलीस ठाण्यातून कार्यमुक्तही करण्यात आले होते, अशीही माहिती पुढे आली आहे.