मुंबई – काल भारतीय शेअर बाजारात तुफान विक्री होऊन शेअर बाजार निर्देशांक अडीच टक्क्यांनी कोसळले होते. मात्र आज देशांतर्गत गुंतवणूकदारांनी प्रचंड खरेदी केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक तब्बल 3 टक्क्यांनी वाढले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,534 अंकांनी वाढून 54,326 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ तीन टक्क्यांनी म्हणजे 456 अंकांनी वाढून 16,266 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारात आज खरेदीचा जोर इतका होता की सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले. त्यामुळे काल झालेली झीज आजच्या जोरदार खरेदीमुळे भरून निघाली. सेन्सेक्स संबंधातील सर्व म्हणजे तीस कंपन्यांच्या शेअरचे भाव आज भरमसाठ वाढले. त्यामध्ये डॉक्टर रेड्डीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, नेसले, लार्सन अँड टुब्रो, ऍक्सिस बॅंक, सन फार्मा, स्टेट बॅंक, एचडीएफसी यांचा समावेश होता. चीन, दक्षिण कोरिया, तैवान, हॉंगकॉंग, जपान या आशियाई देशासह ब्रिटन, जर्मनीसह युरोपातील सर्व देशाचे निर्देशांक आज वाढले. मात्र काल अमेरिकेचे निर्देशांक कमी झाले होते.
कच्च्या तेलाच्या दरात आज काही प्रमाणात घट झाली. तर रिझर्व बॅंकेने जोरदार हस्तक्षेप केल्यामुळे रुपयाचा भाव काही प्रमाणात वाढला होता. परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच असल्याचे वातावरण असून या गुंतवणूकदारांनी काल 4,899 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. याचा अर्थ देशातील किरकोळ गुंतवणूकदार आणि संस्थागत गुंतवणूकदार जोरदार खरेदी करून पोझिशन घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. जर युद्ध लवकर समाप्त झाले तर आता खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना चांगलाच लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र अमेरिका वर्षभर व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार नजीकच्या भविष्यात तरी भारतात खरेदी करण्याची शक्यता कमी असल्याचे समजले जाते.
चीनमधील व्याजदर कपात कारणीभुत
युद्ध संपलेले नाही, अमेरिका व्याजदर वाढ करणार आहे, अशा परिस्थितीतही आशियातील शेअर निर्देशांक आज वाढले. याला कारणीभूत चीनमधील व्याजदर कपात समजली जात आहे. चीनच्या रिझर्व बॅंकेने आपला मुख्य व्याजदर 4.6 टक्क्यांवरून 4.45 टक्के इतका केला आहे. याचा अर्थ चीनमधील करोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येते.