सातारा -राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) विभागाचे उपअभियंता विकास कदम सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत. अनेक सदस्यांच्या याबाबत तक्रारी आहेत. सलग तीन मिटींगला ते उपस्थित नाहीत. कदम यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी, अशी सूचना करत सदस्यांनी आरोग्य समिती सभेत आक्रमक भूमिका घेतली. या उपअभियंत्यावर कारवाई करण्याची सूचना उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत यांना केली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. या सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, सदस्य उपस्थित होते. या सभेत करोनाबाबत तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. करोनाबाबत आरोग्य विभाग चांगले काम करत आहे.
नागरिकांना जास्तीतजास्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना विधाते यांनी केली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान विभागावरील चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. ग्रामीण भागात योजना राबवत असताना या विभागाचे उप अभियंता कदम यांच्या कामाबाबतच्या तक्रारींचा पाढाच सदस्यांनी मांडला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्याकडे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या उपअभियंत्यावर कारवाई करण्याची सूचना उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत यांना केली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही सदस्यांनी केली.