सारं जग करोनाच्या विळख्यात सापडलं असताना इतर महत्त्वाच्या घटनांकडे आपलं थोडं दुर्लक्ष होतं आहे. पण अवकाश प्रवास हे क्षेत्र असं आहे की मोहिमांची आखणी दोन-तीन वर्षंआधी होत असते. शिवाय अवकाशयानाचं उड्डाण हे अनेक गोष्टींची नेमकी सांगड घालून करणं आवश्यक असतं. त्यामुळे तांत्रिक कारण असल्याशिवाय कसल्याही, कोणत्याही परिस्थितीत ठरलेली योजना थांबवणं योग्य नसतं.
म्हणूनच या साथीच्या काळातही स्पेस-एक्सने आपली ठरलेली उड्डाणमोहीम पूर्ण करायचा निश्चय केला आणि ती मोहीम यशस्वीपणे पार पाडलीही! नासा आणि स्पेस-एक्स यांनी संयुक्तरीत्या ही “डेमो-2 मोहीम’ आखली होती. स्पेस-एक्सच्या क्रू ड्रॅगन यानातून दोन अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर नेण्याची ही मोहीम दोन्ही गटांना महत्त्वाची होती. नासाने पहिल्यांदाच एका खासगी कंपनीबरोबर असा करार केला होता आणि यावरून पुढच्या खासगी मोहिमांचे निर्णय होणार होते. तर स्पेस-एक्स पहिल्यांदाच अवकाशवीरांना घेऊन प्रवास करणार होती.
उड्डाणाचा दिवस ठरला होता 27 मे. पण प्रत्यक्षात त्या दिवशी हवामान खराब असल्याने उड्डाण 30 मेपर्यंत पुढे ढकलावं लागलं. तरीही हार न मानता सर्वांनी आपली तयारी ठेवली. रॉबर्ट बेन्केन आणि डग्लस हर्ली हे दोन अवकाशवीर गेली वीस वर्षे नासामध्ये वेगवेगळ्या भूमिकेत काम करत आहेत आणि नव्या अवकाशवीरांना प्रशिक्षण देत आहेत. डेमो-2 मोहिमेत निवड झाल्यावर त्यांनी आपलं पूर्ण लक्ष इथेच केंद्रित केलं होतं. अशा प्रकारच्या पहिल्यावहिल्या उड्डाणात थ्रिल असतं तितकाच धोकाही असतो याची पूर्ण जाणीव ठेवून ते या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनीच हौसेने या यानातल्या त्यांच्या कॅप्सूलचं नामकरण एंडेव्हर असं केलं, यामागील सर्वांचे परिश्रमाचं द्योतक म्हणून.
सुमारे एकोणीस तासांचा प्रवास करून हे यान अवकाश स्थानकापर्यंत पोहोचलं आणि डॉक झालं. स्थानकावरचे ख्रिस कॅसिडी हे वरिष्ठ तज्ज्ञ या डॉकिंगचं नियंत्रण करत होते. आजवर रशियाच्या सोयूझ यानातून अवकाशवीर स्थानकावर ये-जा करत होते. हे क्रू ड्रॅगन नवीन यान असल्याने सर्वांनाच या डॉकिंगबाबत उत्सुकता होती. त्यात अवकाशप्रवासात रस असणारे आणि शास्त्रज्ञ तर होतेच. शिवाय तुम्हा-आम्हासारख्या जगभरातल्या कित्येकांनी हे दृश्य नासाच्या साइटवर लाइव्ह पाहिलं. त्यानंतर सुमारे दोन तासांनी या अवकाशवीरांनी अवकाश स्थानकात प्रवेश केला. स्थानकातल्या अवकाशवीरांनी अत्यानंदाने या नव्या पाहुण्यांचं स्वागत केलं. ही यशस्वी मोहीम पार पडल्यावर आता ते तिथे दोन ते चार महिने वास्तव्य करणार आहेत. त्यांच्या तिथल्या प्रयोगांसाठी त्यांना शुभेच्छा!
– डॉ. मेघश्री दळवी