दौंड -शहरातील तुकाईनगर येथील 61 वर्षीय महिलेचा करोनामुळे सोमवारी (दि. 1) मृत्यू झाला. तालुक्यातील करोनाचा हा तिसरा बळी गेला आहे. दोन दिवसांपूर्वी या महिलेला त्रास होऊ लागल्याने तिला दौंड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
करोनाची लक्षणे दिसू लागल्याने तिला पुढील उपचारासाठी पुण्यात यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. तेथे करोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र सोमवारी (दि. 1) रात्रीच या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू असून त्यांची ही करोना चाचणी करण्यात येणार असल्याचेही डॉ. डांगे यांनी सांगितले.