लसीच्या कमतरतेवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; म्हणाले, “देशात लसीची नव्हे तर तुमच्यात…”

नवी दिल्ली – जगभरात करोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. विषाणूच्या साथीने पुन्हा एकदा डोके वर काढण्यामागे करोनाचा ‘डेल्टा’ अवतार कारणीभूत असल्याचं समोर आलंय. ही महासाथ रोखायची असल्यास वेगाने लसीकरण करणे हाच एकमेव पर्याय असल्याचं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. अशातच भारतातील लसीकरण मोहिमेवरून जोरदार राजकारण रंगल्याचं दिसतंय. विरोधक लसींची कमतरता भासत असल्याचा मुद्दा उपस्थित करत असून सत्ताधाऱ्यांकडून लसीकरण मोहीम वेगाने सुरु असल्याचं सांगितलं जातंय.

याच मुद्द्यावरून आज काँग्रेस नेते राहुल गांधी व केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्यात ट्विटर-वॉर रंगलं. याबाबत सावितर वृत्त असे की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर, “जुलै महिना देखील गेला, मात्र लसींची कमतरता मात्र गेली नाही.’ असं ट्विट केलं होत. गांधी यांच्या या ट्विटरवरील टीकेला मांडवीय यांनी प्रत्युत्तर दिलं.

राहुल गांधी यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना मांडवीय लिहतात, “भारतात जुलै महिन्यात लसीचे १३ कोटी डोस देण्यात आले. या महिन्यात लसीकरणाला आणखी वेग येईल. हे शक्य करून दाखवणाऱ्या आरोग्यकर्मींचा आम्हाला अभिमान आहे. आता त्यांचा व देशाचा तुम्हालाही गर्व असायला हवा.”

“असं ऐकण्यात आलंय की, जुलैमध्ये देण्यात आलेल्या १३ कोटी डोसमधील तुम्ही देखील एक लाभार्थी आहात. मात्र तुम्ही यासाठी ना आपल्या वैज्ञानिकांचे आभार मानले ना जनतेला लसीकरण करून घेण्याचं आव्हान केलं. याचाच अर्थ असा होतो की तुम्ही लसीच्या नावाखाली घाणेरडे राजकारण करीत आहात. तसं पाहायला गेल्यास देशात लसीची नव्हे तर तुमच्यात परिपक्वतेची कमतरता आहे.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.