लंडन – इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (EPL 2023) शनिवारी (16 डिसेंबर) ल्युटन टाऊन आणि बोर्नमाउथ हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली. ल्युटन क्लबचा कर्णधार टॉम लॉकियर हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावर कोसळला, त्यामुळे बोर्नमाउथमध्ये खेळला जाणारा इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) फुटबॉल सामना रद्द करण्यात आला. लॉकियरच्या क्लबने ही माहिती दिली आहे.
क्लबच्या माहितीनुसार, 29 वर्षीय लॉकियरची प्रकृती आता स्थिर आहे. त्याला अजून काही चाचण्या कऱणे बाकी आहे. या घटनेनंतर ल्युटनने खेळाडू, कर्मचारी आणि समर्थकांना लॉकियर आणि त्याच्या कुटुंबाच्या समर्थनार्थ एकत्र येण्याचे आवाहन केले. मात्र, हा सामना 65 मिनिटे चालला आणि त्यानंतर तो रद्द करावा लागला. आता हा सामना पुन्हा पहिल्यापासून खेळवला जाणार आहे. सामन्याची तारीख आणि वेळ ईपीएल बोर्ड नंतर ठरवणार आहे.
सामन्याच्या ५९व्या मिनिटाला वेल्सचा हा बचावपटू असणारा टॉम मैदानात पडला. दोन्ही संघाचे खेळाडू लगेच त्याच्याजवळ पोहोचले. ल्युटनचे प्रशिक्षक रॉब एडवर्ड्सही लगेच मैदानात उतरले. २९ वर्षीय टॉमला मैदानावर उपचारानंतर स्ट्रेचरवर बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत त्यांची प्रकृती थोडी सुधारली होती. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी सामना १-१ असा बरोबरीत होता.
लॉकियर मैदानावर कोसळल्यानंतर दोन्ही क्लबच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मैदानावरच त्याच्यावर उपचार सुरू केले. यावेळी ल्युटन क्लबचे चाहतेही भावूक झाले. त्याच वेळी, बोर्नमाउथ क्लबने सांगितले की, टॉम स्थिर असल्याचे ऐकून आम्हाला दिलासा मिळाला आहे. आमचा पाठिंबा टॉम आणि त्याच्या कुटुंबासोबत आहेत. आम्ही सर्व वैद्यकीय कर्मचार्यांचे तत्काळ कारवाई केल्याबद्दल तसेच स्टेडियममधील प्रत्येकाने कठीण प्रसंगी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
मे महिन्यातही हृदयाची शस्त्रक्रिया
यापूर्वी मे महिन्यात वेम्बली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान लॉकियर खाली पडला होता. त्याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली आणि नंतर त्याला खेळण्याची परवानगी मिळाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा मैदानावर उतरत खेळण्यास सुरुवात केल्यानंतर आता पुन्हा आता त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने आता चाहत्यांमध्ये तो मैदानावर येईल का? याबाबत चिंतेचे वातावरण आहे.