कबीर बोबडे
प्रशासकीय इमारतीमधील फलक उरला फक्त नावालाच
नगर – शहरातील कुठल्याही रस्त्यावर दुचाकीस्वार अनधिकृत ठिकाणी गाड्या पार्किंग करतात, त्यामुळे वाहतुकीला अडचणी येतात हे सर्रासचं चित्र आहे. आता मध्यवर्ती प्रशासनाच्या इमारतीसमोर समोर देखील असंच चित्र आहे. प्रशासकीय इमारतीमध्ये नो पार्किंग फलकासमोरच नागरिक गाड्या पार्क करतात.
या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत लाचलुचपत खाते,तहसील कार्यालय, सामाजिक वनीकरण, जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, धर्मदाय आयुक्त कार्यालय, जिल्हा कोषागार, जिल्हा कौशल्य व रोजगार कार्यालय ही शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयातील कामानिमित्त नागरिकांची सतत येथे ये – जा असते. एकाच इमारतीत इतकी शासकीय कार्यालये असल्याने येथे कायम नागरिकांची वर्दळ असते. या नागरिकांच्या पार्किंग ची व्यवस्था म्हणून कार्यालयाच्या आवारातच त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगची सोय केलेली आहे. तरीही बहुतांश नागरिक मनो पार्किंगफ च्या फलकाकडे दुर्लक्ष करून बेशिस्तपणे नो पार्किंग समोरच वाहने पार्क करतात.
कार्यालयाच्या आवारात वाहनांची गर्दी होत असल्याचे अधिकाऱ्यांना देखिल माहीत आहे. जागा दिसेल, तेथे गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे, अडचणी निर्माण होत आहेत. बऱ्याचदा येणाऱ्या – जाणाऱ्याला रस्ता देखील राहत नाही. याकडे अधिकारी साफ दुर्लक्ष करून मनो पार्किंगफ मध्ये वाहने लावणाऱ्यावर कुठलीही दंडात्मक कारवाई करत नाहीत. प्रशासकीय इमारतीच्या आवारातील हे चित्र असेल, तर शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणी यापेक्षा वेगळं चित्र काय असेल.
प्रशासकीय इमारतीच्या आवारात पार्किंग व्यवस्थेच्या नियमांची पायमल्ली होत असतांना पार्किंग व्यवस्थेची शिस्त राखणे महत्वाचे आहे. यासंदर्भात नागरिकांशी बातचीत केली असता, ते म्हणाले मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हे महत्वपूर्ण आणि मध्यवर्ती केंद्र मानले जाते. या ठिकाणी जिल्हाभरातून नागरिक आपल्या कामासाठी येत असतात. इथे पार्किंग ची व्यवस्था कमी आहे, त्यामुळे नागरिक कुठेही पार्किंग करतात. प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य पार्किंग ची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.