शेतात फोफावल्याने शेतकरी त्रस्त
निमसाखर – इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मध्यंतरीच्या अल्प पावसामुळे पिकांपेक्षा कॉंग्रेस गवत जोमात फोफावले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कॉंग्रेसची डोकेदुखी झाली असून मजूर परवडेत नसल्याने शेतकरी तणनाशक फवारत आहेत.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातच नव्हे, तर तालुक्यातच पावसाने रुसवा धरला आहे. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला असला तरी शेतात पेरणी झालेली नाही. काही शेतकऱ्यांनी अल्प ओलीवर पेरणी केली आहे; परंतु दुष्काळात तेरावा महिना म्हणावा, असे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गवताचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. गवताबरोबरच कॉंग्रेस गवताने शेतकरी हवालदिल झाला असून, हे काढण्यासाठी मनुष्य बळावर होणाऱ्या खर्चामुळे शेतकरी मेटाकुटी आला आहे.
निमसाखर, निरवांगी, शिरसटवाडी, खोरोची व दगडवाडीसह अन्य भागात खुरपणीसाठी मजूर महिलांना एका दिवसाला 250 ते 300 रुपये द्यावे लागत आहेत. यामुळे खुरपणीचा मोठा खर्च होत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. मोकळ्या शेतात कॉंग्रेस गवत आढळल्यास शेतकरी रासायनिक फवारणी करून कॉंग्रेस नष्ट करीत आहे.