कुटुंब नियोजनासाठी इंजेक्‍शन “अंतरा’

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध

नगर – शासनाच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतरा इंजेक्‍शन मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दोन अपत्यांमध्ये साधारण 3 वर्षांचे अंतर असणे गरजेचे आहे. लग्न झालेल्या अनेक जोडप्यांना लवकर मुल व्हावे अशी इच्छा नसते. किंवा इतर काही अडचणी असतात.

यामुळे प्रत्येक जण आपापल्या सोयी नुसार पर्याय शोधत असतो. कुटुंब नियोजनासाठी सर्वात सोपी पध्दत म्हणून अंतरा इंजेक्‍शनकडे पाहिले जाते. पूर्वी अंतरा इंजेक्‍शन फक्त जिल्हा सामान्य रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथेच मिळत होते. खासगी रुग्णालयातही अंतरा इंजेक्‍शन उपलब्ध होते; परंतु खाजगी रुग्णालयात जास्त किंमत असल्यामुळे सर्व सामान्यांना परवडत नव्हते. आता जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतरा इंजेक्‍शन मोफत उपलब्ध असणार आहे.

अंतरा इंजेक्‍शन महत्वाच्या वेळेत दिले तर त्यांचा जास्त फायदा होतो. अंतरा इंजेक्‍शन गर्भपातानंतर लगेचच किंवा गर्भपातानंतर 7 दिवसाच्या आत, मासिक पाळीच्या 7 व्या दिवसाच्या आत किंवा स्तनपान करणा-या मातांनी प्रसूतीपश्‍चात 42 दिवसानंतर अंतरा इंजेक्‍शन घेवु शकतात. गर्भधारणा नको असणा-या महिलांनी दर 3 महिन्यांनी अंतरा इंजेक्‍शन घेणे आवश्‍यक आहे जो पर्यंत तिला गर्भधारणा नको आहे तो पर्यंत.

अंतरा इंजेक्‍शनमुळे रक्तक्षय, गर्भाशय व बीजांडाचा कर्करोगापासून बचाव होतो प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. परंतू अंतरा इंजेक्‍शन बंद केल्यानंतर गर्भधारणा होण्यासाठी 7 ते 10 महिन्याचा कालावधी लागू शकतो. अंतरा हे एकदम सोपे इंजेक्‍शन, दंडावर, मांडीवर किंवा नितंबावर घेऊ शकतात. जिल्हास्तरावर आरोग्य विभागाने 78 वैदयकिय अधिकारी, 78 आरोग्य सहाय्यिका, 226 आरोग्य सेविका यांना अंतरा इंजेक्‍शन बाबतचे विशेष प्रशिक्षण दिले आहे.

कुटुंब नियोजनाचा एक नविन, सुरक्षीत आणी उपयुक्त उपाय अंतरा इंजेक्‍शन आहे. अंतरा इंजेक्‍शनचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.