अहमदनगर : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. आज झालेल्या महत्वपूर्ण निर्णयाने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. याच निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, त्यावर कोणीही राजकारण करू नये मराठा समाजातील युवावर्गाला काय मदत करता येईल याबाबत सत्ताधारी व विरोधकांना एकत्र बसून निर्णय घ्यावा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले, “मराठा आरक्षणाचा लढा हा मराठा समाजाने उभा केलेला एक मोठा लढा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर चांगलेच झाले असते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. या न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिलेला आहे. पूर्वीच्या सरकारने जे विधी तज्ञ नेमलेले होते, तेच विधी तज्ञ याही सरकारने कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी याबाबत कुठल्या प्रकारचे राजकारण करू नये.
मराठा समाजातील तरुण पिढीला शैक्षणिक उद्योग यासह विविध क्षेत्रामध्ये काय मदत करता येईल ,याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी बसून निर्णय घ्यावा कारण मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा या समाजाने उभा केलेला एक मोठा लढा आहे. त्यामागे कुठल्याही प्रकारची राजकीय शक्ती नाही. तो एक समाजाचा प्रश्न आहे त्यामुळे या समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करण्याची आवश्यकता आहे, असेही रोहित पवार म्हणाले.