“कोविशील्ड’चा साठा संपत आला; “कोवॅक्सीन’चे वितरणच नाही
पुणे – ‘कोविशील्ड’चा साठा संपत आलेला असताना, त्याऐवजी “कोवॅक्सीन’ लसीचा पुरवठा झाल्याने शहरातील लसीकरण प्रक्रियेला मंगळवारी मोठा फटका बसला. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर जेवढा साठा होता तेवढी “कोविशील्ड’ लस दिवसभरात टोचण्यात आली. तर, काही लसीकरण केंद्रांवर “डोस उपलब्ध नाहीत’ असे कारण देत, नोंदणी केलेल्या नागरिकांना परत पाठवण्यात आले. “कोवॅक्सीन’चे वितरणही केंद्रांवर झालेले नाही. या गोंधळामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तीनही टप्प्यांत महापालिकेला आतापर्यंत “कोविशील्ड’ लसीचे 2 लाख 22 हजार 800 डोस मिळाले होते. तिसऱ्या टप्प्यांत लसीकरणाला भरभरून प्रतिसाद मिळत असताना, लसीचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे महापालिकेने आणखी एक लाख डोसची मागणी केली होती. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागामार्फत रविवारी पालिकेला “कोविशील्ड’ ऐवजी “कोवॅक्सीन’च्या 50 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला.
या गोंधळातच महापालिकेने सोमवारी सर्व सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांना “कोविशील्ड’ लस देण्याच्या सूचना केल्या. मात्र, अनेक केंद्रांवर लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नव्हता. त्यामुळे अनेक केंद्रांनी पहिल्या डोससाठी आलेल्या लाभार्थ्याला लस देण्यासाठी हात आखडता घेतला.
‘डोस उपलब्ध नाहीत’ असे कारण देत कोविन पोर्टलवर नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना, तसेच थेट लसीकरण केंद्रांवर नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत पाठवण्यात येत होते. त्यामुळे लस घेण्यासाठी उत्साहाने आलेल्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता.