नवी दिल्ली : मोदी सरकारच्या खासगीकरण सपाट्याच्या विरोधात आता संघटित क्षेत्रातील कामगार संघटनांनी उचल खाल्ली असून त्यातून आता देशव्यापी संपांची मालिकाच सुरू होत आहे. सोमवारपासून दोन दिवस बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप सुरू झाला आहे.
15 आणि 16 मार्च असे दोन दिवस हा संप असणार असून त्यानंतर लगेच देशातील चार सरकारी विमा कंपन्यांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यांचा देशव्यापी संप 17 मार्चला असणार आहेत. त्यानंतर 18 मार्चला एलआयसीचे कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसने या संपला पाठिंबा देत मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
काँग्रेस पक्षाने ट्विट केले आहे की,’देश नहीं बिकने दूंगा अशा घोषणा देणाऱ्या लोकांच्या विरोधात आज बँक कर्मचारी देशव्यापी संप करत आहे. उद्या आणखी कोणी संप करणार… कारण मोदी सरकार एक एक करून संपूर्ण सरकारी संपत्तीची विक्री करत आहे. हे कुठल्याही परिस्थिती थांबवावे लागेल…’