IPL 2024, Who is Nitish Kumar Reddy : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात एक ना एक तारा चमकत असतो. या स्पर्धेत भारताला अनेक स्टार खेळाडू मिळाले आहेत. आयपीएलने केवळ टीम इंडियालाच नाही तर जगातील अनेक देशांना स्टार खेळाडू दिले आहेत. आता या यादीत नितीश कुमार रेड्डी याचे नाव जोडले जाऊ शकते.
आयपीएल 2024 च्या 23 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. हैदराबादच्या या विजयाचे नायक ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा किंवा एडन मार्कराम नव्हते तर नितीशकुमार रेड्डी होता. या 20 वर्षांच्या खेळाडूने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली आणि आपल्या संघाला 2 धावांनी विजय मिळवून दिला. हैदराबादचा या मोसमातील हा तिसरा विजय ठरला.
20 वर्षांचा नितीश कुमार रेड्डी भुवी (भुवनेश्वर कुमार) प्रमाणे गोलंदाजी करतो आणि क्लासेनसारखी स्फोटक फलंदाजी करतो. पंजाबविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 10व्या षटकात 64 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत रेड्डीने केवळ 37 चेंडूत 64 धावांची खेळी केली. रेड्डीने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 5 षटकार मारले. एकेकाळी डळमळीत झालेल्या हैदराबादच्या डावाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात नितीशने महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर गोलंदाजीत 3 षटके टाकताना नितीशने 33 धावा देत निर्णायक वळणावर जितेश शर्माला बाद करून संघाचा विजय निश्चित केला.
हैदराबादमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या विजयात नितीशने चांगली कामगिरी केली. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. अवघ्या 8 चेंडूत 14 धावा केल्या. एक षटकार आणि एक चौकार मारला.
जाणून घ्या… कोण आहे नितीश कुमार रेड्डी ( Who is Nitish Reddy)
आंध्रसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारा नितीश कुमार रेड्डी ( Nitish Kumar Reddy ) हा प्रतिभावंत खेळाडू आहे. रेड्डी याचा जन्म विशाखापट्टणम येथे झाला. 2018-2019 विनू मांकड अंडर-19 स्पर्धेत आंध्र प्रदेशसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, रेड्डीने उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि प्रकाशझोतात येत प्रसिध्दी मिळवली होती. नितीश भारताचा महान फलंदाज विराट कोहलीसह हार्दिक पांड्या आणि बेन स्टोक्सला आपला आदर्श मानतो.
Superb knock, Amazing catch, Crucial bowling! 👌 👌
Nitish Kumar Reddy made his presence felt today and wins the Player of the Match Award 👏 👏
Scorecard ▶ https://t.co/JP3mpkETgx #TATAIPL | #PBKSvSRH | @SunRisers pic.twitter.com/QBpsw9vM69
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2024
नितीश ( Nitish Reddy )पहिल्यांदा 2017-18 च्या हंगामात प्रसिद्धीझोतात आला. विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये त्याने आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. नितीशने 176.41 च्या आश्चर्यकारक सरासरीने 1 हजार 237 धावा केल्या होत्या. स्पर्धेच्या इतिहासातील या सर्वाधिक धावा आहेत. त्याने एक त्रिशतक, दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली होती. त्याने नागालँड विरुद्ध 366 चेंडूत 441 धावा केल्या होत्या. 2018 च्या वार्षिक पुरस्कार समारंभात बीसीसीआय (BCCI) द्वारे नितीशची ‘अंडर-16 श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’ म्हणून निवड करण्यात आली होती.
रेड्डी याने रणजी ट्रॉफी 2023-2024 मध्ये आंध्र प्रदेशकडून खेळताना 7 सामन्यात 366 धावा केल्या, ज्यात एका शतकाचा समावेश होता. नितीश आपल्या बॅटने तर चमकदार कामगिरी करतोच, पण गोलंदाजीतही तो कमाल करतो. त्याने या रणजी मोसमात आंध्रसाठी 7/8 क्रमांकावर सातत्यपूर्ण धावा तर केल्या आणि त्याबरोबर विकेटही घेतल्या. रेड्डीने 7 सामन्यात 25 विकेट्स घेऊन आपल्या हंगामाचा शेवट केला. आंध्रने या मोसमात उपांत्यपूर्व फेरी गाठली तेव्हा तो त्याच्या संघासाठी आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज म्हणून उदयास आला.
नितीशला आयपीएल 2023 च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते, परंतु त्याने फक्त दोन सामने खेळले, तेही एक गोलंदाज म्हणून. रेड्डी IPL 2024 या सीझनमध्ये अशीच कामगिरी करत राहिल्यास तो लवकरच टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. वास्तविक, भारतीय संघ रेड्डीसारख्या अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे, जो हार्दिक पांड्याला पर्याय बनू शकेल. आतापर्यंत रेड्डी विलक्षण दिसत आहेत. तो मोठे फटके सहज खेळतो आणि चांगल्या गतीने गोलंदाजीही करतो. रेड्डी याची खासियत म्हणजे तो वेगवान गोलंदाजासह फिरकीपटू गोंलदाजाविरूध्दी आक्रमक क्रिकेट खेळतो.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये नितीश कुमार रेड्डीची कारकिर्द…
(A) 17 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 566 धावा, 20.96 सरासरी, 52 विकेट
(B) 22 लिस्ट ए सामने, 403 धावा, 36.63 सरासरी, 14 विकेट
(C) 9 टी-20 सामने, 170 धावा, 34.00 सरासरी, 1 बळी
दरम्यान, रणजी आणि विजय हजारे ट्रॉफीमधील चांगल्या देशांतर्गत हंगामानंतर, रेड्डीने आयपीएलमध्ये आपला फॉर्म कायम ठेवला आहे आणि आता तो काय करू शकतो हे दाखवत आहे.