निरव मोदीचा ऑर्थर रोड कारागृहातील मुक्काम ठरला; विषेश कोठडी तयार

मुंबई – पंजाब नॅशनल बॅंकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपानंतर फरार झालेला हिरे व्यापारी निरव मोदी याला भारताकडे हस्तांतरीत करण्याची तयारी इंग्लंडमधील उच्च न्यायालयाने दाखवल्यानंतर मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात त्याच्यासाठी विषेश कोठडी तयार करण्यात आली आहे.
निरव मोदीला (वय 49) मार्च 2019 मध्ये इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने जामीनासाठी अनेक वेळा अर्ज केला. मात्र त्याच्या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता त्याला जामीन नाकारण्यात आला. तो त्यानंतर लंडनमध्ये गजाआडच होता.

निरव मोदीला एकदा मुंबईला आणल्यानंतर त्याला बराक क्र. 12 मधील तीनपैकी एका कोठडीत ठेवण्यात येईल. त्याला कारागृहात ठेवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली. त्यासाठी कारागृहातील कोठडी तयार आहे, असे कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारताकडे त्याला हस्तांतरीत करण्याचे मोठे यश भारतीय प्रशासनाने गुरूवारी मिळवले. याबाबतचा निकाल देताना इंग्लंडमधील न्यायालयाने नमूद केले की, “मोदीने भारतीय न्यायालयालाच उत्तर द्यावे एवढाच हा प्रश्‍न नसून भारतीय न्यायालयात त्याच्यावर नि:पक्ष खटला चालवला जाणार नाही, याचा कोणताही पुरावा सध्या दिसत नाही.’ न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारताकडे हस्तांतरणाला विरोध करण्याचे निरव मोदीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.

निरव मोदीला कोठडीत ठेवल्यानंतर त्याला मिळणाऱ्या सुविधा आणि कारागृहाची स्थिती याबाबत राज्य सरकारच्या कारागृह विभागाने 2019मध्ये माहिती केंद्राला कळवली होती. ही माहिती केंद्र सरकारने मागविली होती. त्यावेळी वेस्टमिनिस्टर न्यायाधिशांच्या न्यायालयात हा हस्तांतरणाचा खटला सुनावणीच्या अवस्थेत होता. त्याला कारागृहात पुरवल्या जाणाऱ्या सुविधांबाबत राज्याच्या गृह विभागाने केंद्राला लेखी माहिती दिली होती.

मोदीला ठेवले जाईल, त्या कोठडीत कैद्यांची संख्या अत्यल्प ठेवण्याची हमी कारागृह प्रशासनाने दिली होती. जर मोदीला कारागृहात आणले तर त्याला तीन चौरस मिटरची व्यक्तीगत जागा, कापडी अंथरूण, उशी, बेडशीटस्‌ देण्यात येतील. पुरेसा प्रकाश, खेळती हवा आणि व्यक्तीगत वस्तू ठेवण्यासाठी सुविधा देण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.