वानवडी – सायकल ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल (दुचाकी) चालक घुसखोरी करीत असल्याने सायकलस्वारांना अडथळा येत आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने सायकल ट्रॅकवर दुचाकीस्वार वाहने दामटत आहेत. शहरातील सर्वच सायकल ट्रॅकची अशी अवस्था असल्याने हे ट्रॅक सायकलसाठी की मोटारसायकलसाठी असा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत महानगरपालिकेसह वाहतूक पोलिसांनी कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
फातीमानगर चौक-रामटेकडी दरम्यान सायकल ट्रॅकवर दुचाकीस्वार तसेच रिक्षाचालकांची घुसखोरी सुरू असल्यामुळे या मार्गात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सायकलस्वारांना जलद तसेच सुरक्षित प्रवास करता यावा, याकरिता सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली. परंतु, अशा सायकल ट्रॅकचा वापर दुचाकीस्वारांकडूनच अधिक प्रमाणात होत आहे. मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यास अशा ट्रॅकचा वापर दुचाकीस्वारांकडून केला जात आहे. फातीमानगर चौक-रामटेकडी या सायकल ट्रॅकवर असा प्रकार प्रामुख्याने पहायला मिळत आहे.
सायकल ट्रॅकवर अतिक्रमणे…
शहरात या पूर्वी 180 किलोमीटरचे सायकल ट्रॅक तयार करण्यात आले. त्यातील 92 किलोमीटरचे सायकल ट्रॅक अस्तित्वात आहेत, तर 54 किलोमीटरच्या ट्रॅकमध्ये सलगता नाही, याचबरोबर 36 किलोमीटरचे ट्रॅक नावापुरते आहेत. अस्तित्वात असलेल्या सायकल ट्रॅकवर अनेक ठिकाणी दूरध्वनीचे बॉक्स, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर्स, पथारीवाले, बसथांबे आदींची अतिक्रमणे झाली आहेत.