रेडा – इंदापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय म्हणून तालुक्यामध्ये परिचित असलेल्या निमगाव केतकी गावांमध्ये तब्बल वीस ते बावीस गावांतील रुग्णांना हे ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी यातनामय होत आहे. याठिकाणी वेळेवर डॉक्टर न मिळणे, निवासी व्यवस्था नसणे, प्रसूती झालेल्या महिलांना गरम पाणी न मिळणे, जुन्या खाटा न बदलणे, लाखो रुपयांचा खर्च दाखवून देखील ग्रामीण रुग्णालयासमोर स्वच्छता नसणे, आयुर्वेद गार्डनच्या नावाखाली निधी खर्च करणे, रुग्णांकडे दुर्लक्ष ही कारणे रुग्णांच्या मुळावर उठत आहेत. ग्रामीण रुग्णालयाची सुधारणा कधी होणार, असा सवाल 22 गावांतील नागरिकांनी केला आहे.
निमगाव केतकी येथे कित्येक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालय शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. याठिकाणी रुग्णालयास पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मोठी जागा उपलब्ध आहे. तसेच बारामती इंदापूर या मुख्य रस्त्यावर ग्रामीण रुग्णालयाची इमारत असताना रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. काही वर्षांपासून सातत्याने तक्रारी आहेत. काही वर्षे तर रुग्णालयात वापरण्यासाठी व पिण्यासाठी पाणी नव्हते. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी विशेष लक्ष पुरवून याठिकाणी गावकऱ्यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था केली आहे. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक रुग्ण निवासी राहण्यासाठी तयार होत नव्हते. परंतु आता पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे ऍडमिट रुग्णांची संख्या वाढत आहे.
ग्रामीण रुग्णालयांमध्ये परिसरातील वीस ते बावीस गावांतील प्रसूतीसाठी रुग्ण ये- जा करतात. शासनाच्या माध्यमातून त्यांना सुविधा निर्माण करून देण्यासाठी सोलर हिटर दोन संच रुग्णालयाला पुरविले होते. मात्र याठिकाणी कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांचे लक्ष नाही. तसेच वैद्यकीय अधिकारी यांचे पद रिक्त असल्यामुळे तीन वर्षांपासून हे सोलर हिटर बंद आहे. त्यामुळे महिलांना गरम पाणी मिळत नाही. आरोग्य अधिकारी केवळ सह्या करण्यासाठी येतात, अशी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता दहा ते पंधरा दिवसांमध्ये आरोग्य अधिकारी यांच्या सह्या हजेरी रजिस्टरला दिसत नाहीत. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांच्याकडे निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयाचा चार्ज आहे.
मात्र, इंदापूरचे उपजिल्हा रुग्णालय मोठे असल्यामुळे व याठिकाणी लहान मोठ्या शस्त्रक्रिया सातत्याने होत असल्यामुळे दोन ठिकाणचे काम डॉ. मोरे यांना न पेलणारे आहे. रुग्णालयात जुन्या जीर्ण खाटा झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव यावरच उपचार घ्यावे लागतात. ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बाहेरून नुसता देखावा आहे. मात्र रुग्णालयात प्रवेश करतानाच आयुर्वेद गार्डनमध्ये काटेरी झुडपे व गवताने थैमान घातले आहे. यामधून आयुर्वेद वनस्पती शोधून सापडत नाहीत. त्यामुळे नुसती गोंडस नावे देऊन निधी लाटला जातोय का, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
नियमाप्रमाणे आरोग्य अधिकाऱ्याच्या रजिस्टरवर सह्या पाहिजेत
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांच्याकडे निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयाचा प्रभारी चार्ज आहे. त्यामुळे यासंदर्भात डॉ. मोरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, नियमाप्रमाणे रोज जे ड्युटीवर आरोग्य अधिकारी असतील. त्यांनी सह्या करणे गरजेचे आहे.
मात्र, अशा सह्या जर केल्या नाही तर वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात येईल. निमगाव केतकी ग्रामपंचायतीने गरम पाण्याची सोलर सिस्टिम येथील रुग्णालयाला दिली आहे. मात्र, ती बंद आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीला आम्ही लेखी दुरुस्ती संदर्भात कळवले असल्याची माहिती डॉ. राजेश मोरे यांनी दिली.
रस्त्याची दुरवस्था
इंदापूर बारामती रस्त्यावर निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालय मुख्य रस्त्यापासून आत आहे. रुग्णालयात येण्यासाठी रस्ता खडतर झाला आहे. खडी उखडली आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रत्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो, या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रुग्णांची आहे.