मुक्‍या जनावरांना मरणानंतरही यातना

मनपाचा भोंगळ कारभार; मृत जनावरे सडण्यासाठी टाकली जातात 22 फूट खड्ड्यात
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; हरित लवादाचे आदेश फाट्यावर
रवींद्र कदम
नगर (प्रतिनिधी) –हरित लवादाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुरुडगाव येथे महापालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात खड्डा घेवून त्यात प्लॅस्टिक कागद टाकून साडेपाच लाखाचे पत्र्याचे शेड करण्यात आले. त्यात मृत जनावरे टाकली जातात. मात्र या मुक्‍या जनावरांना तसेच त्या खड्ड्यात टाकले जात आहेत. त्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नसल्याने त्याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे मुक्‍या जनावरांच्या मरणानंतरही यातनांचे भोग संपेना. अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.

शहरापासून 13 किमी अंतरावर असलेल्या बुरुडगाव येथे महापालिकेच्या कचराडेपोत एका बाजूला स्वच्छता विभागाच्या वतीने मोकाट जनावरांच्या मृत देहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्र्याचे शेड दीड महिन्यापूर्वी बनविण्यात आले आहे. त्यासाठी साडेपाच लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. त्याठिकाणी शहरातील मृत जनावरे टाकून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे सांगण्यात आले. मात्र असे न होता महापालिका प्रशासन शहरातील मृत जनावरे त्या 22 फूट खड्ड्यात टाकत असून त्यावर साधी मातीही लोटली जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत ही याबाबत नगरसेवक गणेश भोसले यांनी आवाज उठवला. मात्र त्याकडे आरोग्य विभागाचे प्रमुखांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हरित लवादाचे आदेश महापालिकेने फाट्यावर बसविले असल्याचे दिसत आहे.

गेटला भिंतीचा आधार
उभारण्यात आलेल्या शेडमध्ये 22 फूट खड्डा घेण्यात आला आहे. त्यामध्ये प्लॅस्टिक टाकून त्यात मृत जनावरे टाकली जातात. त्यामृत जनावरांना कुत्र्यांनी खावू नये, यासाठी गेट करण्यात आले आहे. मात्र दीड महिन्यात गेटला उतरती कळा लागली असून भितीचा आधार घेतल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. खर्चाबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

आरोग्य अधिकारीच अनभिज्ञ
गेल्या महिन्याभरात आज तयागत या खड्ड्यात किती मृत जनावरे टाकाली आहेत, असे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना विचारले असता तेच अनभिज्ञ असल्याचे समजले. तसेच त्यांनी याठिकाणी वस्तूस्थितीची पाहाणी केली आहे, का नाही याबाबतची मात्र शंकाच आहे.

महापालिकेला दंड झाला तरच प्रशासन सुधारेल : भोसले
नगरसेवक गणेश भोसले यांनी ही शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी सभेत प्रशासनाचे वाभाडे काढले. मृत जनावरांबाबत त्याठिकाणचे फोटो माझ्याकडे आले असून, ते राष्ट्रीय हरित लवादाला पाठविणार आहे. त्यामुळे महापालिकेला आणखी दोन – पाच कोटींचा दंड झाला तरच प्रशासन सुधारेल,’ अशी संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.