नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांत 254.7 कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती सरकारच्या वतीने राज्यसभेत देण्यात आली आहे. राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले की, उपलब्ध माहितीनुसार गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावरचा खर्च 2,54,87,01,373 रुपये आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाची 9 वर्षे पूर्ण झाली आहेत.
गेल्या 9 वर्षातील नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे देखील गाजले. आहेत. दरम्यान, मोदींच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अलिकडच्या काही महिन्यांत मोदींच्या परदेश दौऱ्यांवरही विरोधकांनी सवाल केले होते. या परदेश दौऱ्यांमध्ये उद्योजक गौतम अदानी मोदींसोबत किती वेळा होते, असे प्रश्न विरोधकांनी विचारले होते.