मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने आपला अलिशान बंगला विक्रीला काढला आहे. वॉर्नने 2008 साली 40 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या या बंगल्याचा येत्या 4 एप्रिल रोजी लिलाव होणार असून या लिलावातून जवळपास 55 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा वॉर्नने केली आहे.
वॉर्नने हा बंगला प्रसिद्ध फुटबॉलपटू मॅथ्यू लॉइड याच्याकडून 40 कोटी रुपयांना विकत घेतला होता. फाइव्ह स्टार जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या वॉर्नच्या या बंगल्यात पाच सुसज्ज बेडरूम आहेत. खासगी बार, होम थिएटर तसेच ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव व स्पा अशा अत्याधुनिक सुविधा आहेत.
वॉर्न महान क्रिकेटपटू असला तरी त्याच्या लहरी स्वभावासाठीही तो प्रसिद्ध असला तरी समाजकार्यासाठीही त्याची वारंवार प्रशंसादेखील झाली आहे. याच वर्षी ऑस्ट्रेलियातील जंगलाला भीषण आग लागली होती, त्यावेळी वॉर्ननेच पुढाकार घेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांना निमंत्रित करत त्याने या आगीतील पीडितांसाठी मदतनिधी सामन्याचे आयोजन करत करोडो रुपयांचा मदतनिधी मिळवुन दिला होता. तसेच त्याने कसोटी क्रिकेट खेळताना वापरलेली बॅगी ग्रीन कॅप देखील लिलावात विकली होती व त्यातून आलेला निधीही त्याने दिला होता.
आपल्या कारकिर्दीत त्याने अनेकदा आपल्या दातृत्वाचे दाखले दिले आहेत. आताही आपला बंगला विक्रीला काढला असला आणि त्याचे कारण त्याने जाहीर केले नसले तरीही त्यातही त्याचे समाजकार्यच असणार अशी खात्री सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.