नवी दिल्ली, दि. 18 – पंजाब विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना अंमलबाजावणी संचनालयाने (ईडी) लुधियाना, मोहाली आणि पठाणकोटमध्ये 10 ठिकाणी छापे टाकले. त्यात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या भाच्याचा समावेश आहे.
पंजाब पोलिसांनी 2018 मध्ये कुदरतसिंग या मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास ईडी करत आहे. कुदरतसिंगने दोन कंपनी स्थापन केल्या होत्या. त्यात चन्नी यांचा भाचा भुपिंदरसिंग हनी आणि संदीपसिंग हे संचालक होते. या कंपन्यांच्या संचालकांचे व्यवहार तपासण्यासाठी ही शोधमोहीम राबवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बेकायदा खाणीची हा गुन्हा पंजाब पोलिसांनी दाखल केला होता. खाण अधिकाऱ्यांनी ही फिर्याद दिली होती. या प्रकरणात 26 आरोपी होते. त्यातील बहुसंख्य ट्रक ड्रायव्हर होते. त्या ठिकाणी दगड खाणीतील क्रश भरलेले 30 ट्रक अडवण्यात आले होते. हे ट्रक जेथे अडवण्यात आले तेथे खाणकाम करण्यास परवानगी नाही. त्यावेळी यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली. मात्र, ती खाणकामासाठी वापरत नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.
या छाप्यांवर प्रतिक्रिया देताना चन्नी म्हणाले, दबाव टाकण्याचे तंत्र… प. बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नातेवाईकांबाबात जे केले त्याची पुनरावृत्ती झाली.
कॉंग्रेस नेत्या आणि माध्यम समन्वयक अलका लांबा यांनी ट्विट करून त्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्या म्हणतात, निवडणुकीच्या सीबीआय, ईडी आणि आयकरच्या धाडी हे भाजपाचे शस्त्र आहे. 1. निवडणुकीच्या आधी केवळ दोन दिवस डिएमके प्रमुख एम के स्टॅलीन यांच्या घरावर आयकरच्या धाडी. 2. निवडणुकीआधी केवळ एक महिना अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर छापा. 3. निवडणुकीच्या आधी शरद पवार यांच्या नातेवाईकांवर ईडीचे छापे.