मेक्सिको – प्रेयसी आणि प्रियकर एकमेकांवर खुप प्रेम करतात. एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. मात्र, काहीवेळा प्रेमात धोकाही मिळतो. अशीच एक प्रेमात धोका मिळालेली घटना मेक्सिकोत घडलीय. येथील ऊजिएल मार्टिनेज या तरूणाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना अशी की, शिक्षक असणाऱ्या ऊजिएल मार्टिनेजने त्याच्या प्रेयसीच्या आईला किडनी दान केली. मात्र त्याच महिन्यात प्रेयसीने त्याची साथ सोडून दूसरे लग्न केले. त्यामुळे तो प्रचंड दु:खी झाल्याचे व्हिडीओत सांगतो.
‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, मार्टिनेजच्या प्रेयसीच्या आईला किडनीची आवश्यकता होती. प्रेमापोटी त्याने किडनी दान केली. मात्र शस्त्रक्रियेच्या एका महिन्याच्या आतच त्यांचं ब्रेकअप झालं. एवढच नाही तर त्याच्या प्रेयसीने दुसऱ्यासोबत लग्नही केलं. या घटनेनंतर मार्टिनेजने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपले दु:ख व्यक्त केले आहे. व्हिडीओत तो सोफ्यावर झोपलेल्या अवस्थेत दिसत असून तो घडलेली घटना लोकांना सांगत असल्याचे दिसते. हे ऐकल्यावर लोक हैराण झाले.
सोशल मीडियावर लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. लोक त्याला समजावत आहेत की, त्याने दु:खी होऊ नये. एक व्यक्ती म्हणाला की, तुला दु:खी होण्याची गरज नाही. कारण तिने एका फारच दिलदार व्यक्तीला गमावले. एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं की, यातून बाहेर पडून अशा मुलीची निवड कर जी तुझा स्वीकार करेल. या व्हिडीओनंतर मार्टिनेजने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करून प्रेयसीशी लग्नानंतरही चांगले रिलेशन असल्याचे सांगितले.