क्लार्ककडून गौप्यस्फोट
मेलबर्न – विराट कोहली आजच्या घडीला भारतीय क्रिकेटचा बॉस आहे. त्याची नाराजी झाली तर त्याच्या शिफारशींवर मिळणारे इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) प्रचंड रकमेचे करार थांबतील, अशी भीती असल्याने अनेकदा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू देखील त्याला स्लेजिंग करायला घाबरायचे, असा गौप्यस्फोट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने
केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अनेकदा विविध मालिका झाल्या. यातील बहुतांशी मालिका खेळाबरोबरच स्लेजिंगबाबतही गाजल्या. मात्र, जेव्हा कोहली भारतीय क्रिकेटचा नवा बॉस म्हणून गणला जाऊ लागला तेव्हा आमचे खेळाडू त्याच्याबाबतीत स्लेजिंग करायला तयारच होत नव्हते. आम्हाला कोहलीशी पंगा घेणे परवडणारे नाही. त्याच्यामुळेच आम्ही पुढील काही वर्षे तरी आयपीएलच्या संघांत मोठ्या रकमेच्या करारातून प्रचंड आर्थिक कमाई कक्षप शकतो, असे मला अनेक क्रिकेटपटूंनी खासगीत बोलताना सांगितले आहे, असेही क्लार्कने स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांपासून मी पाहात आहे. महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू त्या संघातील अनेक खेळाडूंना स्लेजिंग करत होते. मात्र, जेव्हापासून कोहली कर्णधार बनला तेव्हापासून हा प्रकार थांबला. आयपीएलच्या करारातून मिळणारा प्रचंड पैसा खेळाडूंना खुणावतो व त्यामुळेच ते कोहलीला स्लेजिंग करण्यास घाबरतात, असे स्पष्टीकरणही क्लार्कने दिले आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हिव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, हरभजनसिंग, युवराजसिंग यांच्यासह अनेक खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये स्लेजजिंगचा सामना करावा लागला आहे. त्यातच याच स्लेजिंगवरुन हरभजनसिंग व ऍण्ड्रयू सायमंड्स यांच्यात वाद झाले होते व ते प्रकरण प्रचंड गाजलेही होते. मात्र, कोहली कर्णधार झाल्यापासून हे प्रकार थांबल्याचेही अनेकदा जाणवले, असेही त्याने सांगितले.
करोनामुळे यंदाची आयपीएल पुढे ढकलली जाणार का, रद्दच होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, त्यापूर्वी या स्पर्धेतील संघांनी खेळाडूंना नव्याने लिलावात बोली लावून खरेदी केले. त्यात ऑस्ट्रेलियाच्याच खेळाडूंचा वरचष्मा राहिला आहे. पॅट कमिन्स या नवोदित अव्वल वेगवान गोलंदाजाला चक्क 15.50 कोटी रुपयांची बोली लावुन कोलकाता नाइट रायडर्सने खरेदी केले. केवळ कमिन्सच नव्हे तर अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, नॅथन कुल्टरनाइल, स्टिव्ह स्मिथ तसेच डेव्हिड वॉर्नर यांनीही प्रचंड रकमेचे करार मिळविले. स्पर्धेचे यंदा 13 वे वर्ष आहे. यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये देखील ऑस्ट्रेलियाच्याच खेळाडूंचा लिलावात बोलबाला राहिला आहे.