शिर्डी – शिर्डी येथे श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी लाखो साईभक्तांनी साई समाधीचे दर्शन घेतले. भक्तांच्या गर्दीमुळे शिर्डीतील हॉटेल, लॉजिंग व भक्तनिवास हाउसफुल झाले आहे.
श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी आज (गुरुवार) अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईसच्चरित ग्रंथाची द्वारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी वीणा, वैद्यकीय संचालक ले.कर्नल डॉ. शैलेश ओक व संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी श्रींची प्रतिमा घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.
या वेळी संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, मालती यार्लगड्डा, मीनाक्षी सालीमठ, मंदिर विभागप्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री रामनवमी उत्सवानिमित्त गोदावरी नदीपात्रातून ग्रामस्थांनी आणलेल्या गंगाजलाचे पूजन करण्यात आले.
श्री साई समाधी मंदिरात श्रींची विधिवत पाद्यपूजा यार्लगड्डा दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. या वेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मीनाक्षी सालीमठ, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभागप्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते. श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी द्वारकामाई मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गव्हाच्या पोत्याची पूजा करण्यात आली.
लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री रामनवमी उत्सवाच्या शुभमुहूर्तावर पूर्वीप्रमाणे दर्शनरांगेतील प्रत्येक साईभक्तास मोफत बुंदी प्रसाद पाकीट वितरण करण्याचा प्रारंभ करण्यात आला. श्री रामनवमी उत्सवानिमित्त अमेरिका येथील साईभक्त शोभा पै यांच्या देणगीतून समाधी मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
विक्रम नांदेडकर यांचे श्रीराम जन्मावर कीर्तन झाले. कीर्तनानंतर श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मंदिर विभागप्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, शिर्डीत सर्व पालख्या व हजारो साईपदयात्री, तसेच विविध वाहनांमधून साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत.
शिर्डी साईभक्तांनी व साईनामाने दुमदुमून गेली आहे. संस्थान सुरक्षा विभाग व पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. साईभक्तांमुळे शिर्डीतील सर्वच हॉटेल व लॉजिंग, तसेच साईबाबा संस्थानचे भक्तनिवास गर्दीने हाउसफुल झाले आहे. शिर्डी वाहनांच्या गर्दीमुळे, सर्वच रस्ते भक्तांच्या गर्दीमुळे फुलून गेले होत.
कार्यक्रमांची रेलचेल!
रामनवमी उत्सवानिमित्त यात्रोत्सव कमिटीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (शुक्रवार) सायंकाळी 6 ते रात्री 11 साईनगर मैदान येथे महिलांसाठी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून, तसेच याच दिवशी कुस्ती हगामा व रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा, तसेच शनिवारी (दि. 1 एप्रिल) सायंकाळी बारा गावच्या बारा अप्सरा लावणी महोत्सव, व श्वेता खरात, तेजा देवकर, सुनीता गायकवाड या तीन तारकांच्या धमाल गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. नागरिकांनी कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीचे ताराचंद कोते व इतर सदस्यांनी यांनी केले आहे.