कर्जत – दहा रुपयांची नाणी पूर्णपणे वैध असून, ती भारतीय चलनाचाच एक भाग असल्याचा निर्वाळा भारतीय रिझर्व्ह बॅंकेने वारंवार देऊनही तालुक्यात दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास बॅंका कचरत असल्याचे दिसून येत आहे. मिरजगाव येथील सहकार बॅंकेकडून ग्राहकांची दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देण्यात येत असल्याने ग्राहकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
वास्तविक पाहता दहा रुपयांची नाणी दुकानदारांपासून सर्वच खासगी आणि सरकारी आस्थापनांमध्ये स्वीकारण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना आरबीआयकडून देण्यात आल्या आहेत. परंतु शेतकरी आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांची बॅंक अशी ओळख असलेल्या मिरजगाव सहकार बॅंकेनेच या नियमाला हरताळ फसल्याचे दिसत आहे.
याबाबत अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या असूनसुद्धा दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांनी खाते बंद करून बॅंकेपुढे ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत संबंधित बॅंकेकडे विचारणा केली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाणे स्वीकारू नये, अशा सूचना आहेत अशी माहिती देण्यात आली.
काय आहेत रिझर्व्ह बॅंकेचे निर्देश –
दहा रुपयांची नाणी घेण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी रिझर्व्ह बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया व इतर बॅंकांकडे येत होत्या. त्याची दखल घेत रिझर्व्ह बॅंकेने 10 रुपयांची 14 डिझाइनची सर्व नाणी वैध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या शिवाय काही शंका असल्यास 14440 या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कर्जाची रक्कम भरण्यासाठी गेलो असता एकूण रकमेत एक दहा रुपयांचे नाणे दिले होते. मात्र, संबंधित रोखपाल यांनी हे नाणे घेण्यास नकार दिला. याबद्दल जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याबद्दलची तक्रार संचालकांकडे केली असून, ते या गोष्टीची गंभीर दखल घेतील अशी अपेक्षा आहे.
– डॉ. नवनीत निंबोरे, ग्राहक